(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मसुद्याबाबत 03-06-2024 पर्यंत अभिप्राय, सूचना मागवण्यात आल्या आहेत, त्याची मुदत चार महिन्यांनी वाढवावी या विषयासंदर्भात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेचे प्रमुख महेश भारतीय व ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी (दिनांक 27 मे 2024 रोजी) जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ही वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी आपाडी असून, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद या मूल्यांवर विश्वास ठेवून काम करते. आपण अभिप्रायासाठी जाहीर केलेला SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा 336 पानांचा आहे. तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी हा आराखडा बनवला आहे. त्यावर अभिप्राय मागवण्यात आला आहे, तो 03 जून 2024 पर्यंत आपल्या कार्यालयात सादर करायचा आहे. हा कालावधी अत्यंत छोटा आहे. तो कालावधी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवावा.
आपणच पुढाकार घेऊन विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण विभाग, मुंबई विभाग अशा विभागात चर्चा अधिवेशन घेऊन, शिक्षक, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून चर्चा करावी, आणि राज्याचा शैक्षणिक आराखडा जो तयार करण्यात आला आहे, त्यातील त्रुटींवर अधिक चांगले काय करता येईल हे पहावे, वैज्ञानिक आधार घ्यावा,
भारतीय संविधानाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधानसभेची निर्मिती झाली असून, महाराष्ट्र विधानसभेने महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक आराखडा निर्माण करण्यासाठी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची निर्मिती केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद या मूल्यांवर ही परिषद निर्माण झाली. विद्यार्थी हा निरागस असतो. कुंभार जसा ओल्या मातीला आकार देऊन, भांडी पडवतो तसा विद्यार्थी हळुवारपणे घडवावा ही अपेक्षा होती. परंतु परिषदेने जो आराखडा तयार केला, त्यात उपवास, व्रतवैकल्ये, आत्मा, पुण्य, यज्ञ, मोक्ष, कर्म, नक्षत्रे, पुण्य कर्म, पंचांग, ज्योतिष ही आणि अशा प्रकारची अशास्रीय कल्पना आणि त्यांचा भडीमार केला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जपण्यासाठी या परिषदेने कार्य करावे ही अपेक्षा असताना, या परिषदेने संविधानाच्या मार्गदर्शक मूल्यांची चेष्टा, अवहेलना केली आहे. कहर म्हणजे जाती- वर्ण विषमतेचा मनू त्याची मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे म्हणजे विद्यार्थ्यांना भेदभाव करण्यास शिकवणे हे परिषदेचे आद्य कर्तव्यच दिसते आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.