(लांजा)
कोत्रेवाडी येथील ९० ग्रामस्थांचा कडाडून विरोध असलेल्या आणि न्यायप्रविष्ठ बाब असलेल्या लांजा कोत्रेवाडी येथील जागेची लांजा नगर पंचायतीकडून डम्पिंग ग्राऊंडसाठी खरेदी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे लांजा शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली आणि माजी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप यांनी केला असून या विरोधात मंत्रालय स्तरावर तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लांजा नगर पंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राऊंड प्रस्तावित आहे. मात्र ही जागा लोकवस्तीपासून अवघ्या ७० ते ८० मीटरवर इतक्या जवळ असल्याने या डम्पिंग ग्राऊंडला कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. यासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषण करण्यात आली होती. नगरपंचायत, जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील सादर करण्यात आली होती. त्यानंतर नगर पंचायतच्या विरोधात लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प होऊ नये या दृष्टीने नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला असून गेली तीन वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
डम्पिंग ग्राऊंड विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देखील लांजा नगरपंचायतीकडून काही दिवसांपूर्वी कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष गुरूप्रसाद तेली व माजी शहराध्यक्ष व प्रमोद कुरूप यांनी केला आहे. मुळातच न्यायप्रविष्ट असलेल्या जागेची न.पं. कडून खरेदी कशी काय करण्यात आली, असा सवाल देखील या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपास्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली असून याबाबत थेट मंत्रालयात या विरोधात तक्रार दाखल करून सखोल चौकशी लावणार असल्याचे माजी शहराध्यक्ष कुरूप यांनी सांगितले.