(रत्नागिरी)
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर आगामी पावसाळ्यात येणाऱ्या विविध समस्या, चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, प्रलंबित कामे, अतिपर्जन्यवृष्टी मुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन समस्या आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने या महामार्गांवर २४ तास आपत्कालीन मदत पथके नेमावित, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार यांना महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत. मान्सून मधील संभाव्य आपत्कालीन स्थितीत काय काळजी घ्यावी याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वच राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग याठिकाणी तात्काळ विविध उपाययोजना करणे, पावसाळ्यामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे बाबत तसेच महामार्गावर होणाऱ्या दुर्घटनांचे वेळी नागरीकांना तात्काळ मदत मिळावी याकरता महामार्गावर ठिकठिकाणी २४ तास सर्व साधनसामुग्रीसह आपतकालीन मदत पथक नेमण्याबाबत महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत.
खड्डे बुजवण्याचे निर्देश
राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह यांचे आदेशानुसार महामार्ग पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले यांचे मार्गदर्शनाखाली महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र पोलीस उपअधिक्षक घनःश्याम पलंगे यांनी मुंबई-गोवा, रत्नागिरी- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच इतर राज्य महामार्गावर आगामी पावसाळयापुर्वी करावयाच्या उपाययोजना बाबत रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील महामार्ग पोलीस मदत केंद्र प्रभारी अधिकारी व महामार्ग चौपदरी करण, दुरुस्ती व देखभाल करणारे संबंधीत विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांची रत्नागिरी येथे बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांनी सांगितले की, महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी ते बुजवून घ्यावे. तसेच ज्या ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलेले नसेल तिथे फलक लावण्यात यावे.
डांबरीकरणाच्याही दिल्या सूचना
पक्का डांबरी रोड करावा. सदरचा रोड पुर्णपणे मातीचा असल्याने तो रोड पाऊस सुरु झाल्यानंतर वाहने अडकून पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. महामार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुला पाणी जाणेकरीता नाला निर्मिती करणे आवश्यक आहे. अन्यथा रोडवर पाणी व माती येण्याची शक्यता आहे. महामार्गावर ज्याठिकाणी नवीन रस्त्याची ऊंची वाढविण्यात आलेली आहे त्याठिकाणी चालु रस्त्यावर पावसामुळे माती वाहुन येण्याची शक्यता असल्याने सँड बॅग लावण्यात याव्यात. मुख्य रस्त्यांच्या साईड पट्टया भरुन घेणे व त्या रोलींग करुन मजबुतीकरण करुन घ्यावे शक्य झाल्यास डांबरीकरण करावे. महामार्गावरील रस्ता दुभाजक पट्टा व वळणावरील साईडचे पांढरे पट्टे ठरावीक ठिकाणी अस्पष्ट झालेले असून, ते रंगवून घेण्याचे आदेश दिले.