(रत्नागिरी)
सध्या अवकाळी पावसाबरोबर होत असलेल्या वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा फटका इंटरनेट सेवेलाही बसताना दिसत आहे. अनेक वेळा इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेच्या व्यवहारांवरही त्याचा परिणाम होत आहे.
गेला आठवडाभर ठिकठिकाणी वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू आहे. काही ठिकाणी झाडे पडणे, विद्युत खांब पडणे अशा घटना झाल्या आहेत. परिणामी इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. साखरपा परिसरात जिओ, आयडिया, व्होडाफोन आणि बीएसएनएल यांच्या सेवा सध्या विस्कळीत झालेल्या अनुभवण्यास येत आहेत. परिणामी गावी आलेल्या चाकरमान्यांना शहरातील नातेवाईकांशी संपर्क ठेवणे अवघड होत आहे. इंटरनेट सेवेचा परिणाम बँकांच्या व्यवहारावर होताना दिसत आहे.
अनेक वेळा सेवा खंडित झाल्यामुळे तर कधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकांच्या व्यवहारात अडथळे येत आहेत. परिणामी बँकांमध्ये खातेदारांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. खरे पाहता महिनाअखेर असल्यामुळे बँकेत गर्दी अभावानेच असते. पण सध्या काम होत नसल्यामुळे सर्रास गर्दी पाहावयास मिळत आहे. पैसे काढणे, पासबुक भरून घेणे अशा कामांना प्रचंड वेळ लागत आहे.