(रत्नागिरी)
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील आरजू टेक्सोल कंपनीने नागरिकांची करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना जून २०२१ ते २३ मे २०२४ या कालावधीत घडली आहे.
प्रसाद शशिकांत फडके (रा. गावखडी, रत्नागिरी) संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि ऊर्फ अमर महादेव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात राजेश प्रभाकर पत्याणे (५२) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार संशयित चार जणांनी आरजू टेक्सोल कंपनी जून २०२१ मध्ये स्थापन करुन २५ हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५,३६ व ६० महिने या मुदतीच्या कंपनीच्या स्किम सुरु केल्या. संशयितांनी फिर्यादींना या स्किम सांगून त्यांना खिळे बनवण्याचे अँटोमॅटिक मशिन, खिळे बनवण्याचा कच्चा माल, तसेच पुरवण्यात आलेला कच्चा माल तयार केल्यानंतर त्याबाबत मोबदला देतो, असे खोटे आश्वासन दिले. त्या नंतर त्यांनी गुंतवलेल्या १८ लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा म्हणून देण्यासह तसेच १५ महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझिटची रक्कमही परत करतो व तसे कंपनीमार्फत अँग्रिमेंट करुन देतो, असे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान, आजपर्यंत फिर्यादी तसेच त्यांच्यासारख्या इतर गुंतरवणुदारांनी या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर जादा परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले मात्र, नंतर त्यांना कोणतीही रक्कम तसेच इतर मोबदला न देता या चार जणांनी एकमेकांच्या सहाय्याने व संगनमताने फिर्यादीची १८ लाखांची तर इतर गुंतवणूकदारांची मिळून करोडोंची रुपयांचे फसवणूक केली असल्याचे उघडकीस येत आहे.