जय जय रघुवीर समर्थ. काही लोक उघडपणे भाग्य भोगतात. चोरटे लोक पळून जातात. काहींची महती प्रकट असते तर काही लोक कानकोंडे असतात. आचार विचाराशिवाय जे जे केले जाईल तो त्रासच आहे. त्यासाठी धूर्त आणि विचक्षण म्हणजे शहाणेच शोधावे. बाजारू लोक उदंड मिळतात पण धूर्तच ओळखले पाहिजेत. धूर्त व्यक्तीपाशी बाजारू व्यक्तीचे काहीच चालत नाही. अनेक बाजारी मिळत असले तरी त्यामुळे मुख्य मुख्य असतील त्यांच्याशी सख्य करावे. धूर्ताला धूर्त आवडतो. धुर्ताचे पोवाडे धूर्तच गातो, इतर लोक काहीही काम नसताना उगीचच वेड्यासारखे हिंडत असतात. धूर्ताला धूर्तपण कळते त्यामुळे मनाला मन मिळते पण हे सगळे गुप्तपणे केले पाहिजे.
समर्थाचं मन राखलं तर तिथे उदंड लोक येतात. जन आणि सज्जन विनंती करतात. ओळखीने ओळख वाढवावी. बुद्धीने बुद्धी जाणावी. नितीन्यायाद्वारे खोट्या, पाखंडी लोकांची वाट रोखून धरावी. वेश बावळा असावा पण अंतरामध्ये नाना कळा असाव्यात. आपल्या सोबत असलेल्या लोकांचा जिव्हाळा मोडू नये. निस्पह आणि नूतन, ब्रह्मज्ञानाचा अनुभवी आणि जाणता सज्जन प्रगट होणे जगात दुर्लभ आहे. नाना गोष्टींचे पाठांतर करावं, लोकांचे मन शांत करावे, त्यांच्या मनात प्रवेश करावा. कायम त्यांच्या मनात राहावे. एका ठिकाणी बसून राहिला की मग व्यापच करता येत नाय्ही. सावधपणे याला त्याला भेट द्यावी. मात्र वारंवार भेटू नये. त्याला पुन्हा भेटण्याची आशा शिल्लक राहिली पाहिजे. ही चातुर्याची लक्षणे आहेत. उत्तम गुणांमुळे मनुष्यमात्राला समाधान मिळते. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षणनाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 15 समास 2 निस्पृह व्याप लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर उदंड अशी लहान थोर मानवी शरीर आहेत. त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती. किती पाहायचं आणि काय पाहायचं? कित्येक म्लेंच्छ होऊन गेले, किती फिरंगी बनले, भाषा कळत नसल्याने काहींचे आडले. महाराष्ट्र देश थोडा वाटायला लागला. राजकारणामुळे लोकांची अडचण झाली. लोकांना उदंड कामें असल्याने जेवायलासुद्धा वेळ मिळेनासा झाला. कित्येक लोक युद्ध प्रसंगांमध्ये गुंतले. त्यामुळे ते उन्मत्त झाले. रात्रंदिवस युद्धाची चर्चा करायला लागले. व्यापाऱ्यांनाही कामे मागे लागली, त्यांनाही वेळ मिळेनासा झाला. निरंतर पोटाचे धंदे सुरू झाले. सहा दर्शने नाना मत याशिवाय नास्तिक मत देखील खूप वाढली आणि पृथ्वीवरती जिथे तिथे उपदेश करायला लागले. उरले सुरले स्मार्त आणि वैष्णवानी नेले. अशाप्रकारची मतं उदंड झाली.
कित्येक वासनेचे भक्त ठाई ठाई आसक्त झाले. चांगले किंवा वाईट पाहतो कोण? योग्य किंवा अयोग्य पाहतो कोण? या कोणी कोणी वाढवलेल्या गलबल्यामध्ये वैदिक लोक दिसेनासे झाले. त्याच्यामध्ये हरिकीर्तन कमी झाले, तिथे कित्येक जन ओढले गेले मात्र अनुभवाचे ब्रह्मज्ञान कोण पाहील? त्यामुळे ज्ञान दुर्लभ झाले. पुण्यामुळे अलभ्य लाभ घडेल. विचारवंतांना सगळं काही सुलभ आहे. विचार कळला तरी सांगता येत नाही. उदंड विघ्न येतात. उपाय योजले तर अपाय आडवे येतात. गैरफायदा घेण्याचे प्रकार दुरुपयोग करणारे लोक भेटतात. त्याच्यामध्ये एक एक क्षण रिकामा जाऊ देऊ नये. सगळ्यांना मानतात, नाना जिन्नस उदंड पाठ आहेत, धडाधड म्हणायला लागतात, असे धूर्त, शहाणे लोक, त्यांनी आपल्या सामर्थ्यामुळे मोठी विस्तीर्ण वाट तयार केली, आपल्या सामर्थ्याद्वारे प्रबोधन शक्तीची अनंतद्वारे मोकळी केली, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनाला निरूपणाची गोडी लागली. विविध मते मतांतर त्यांनी प्रत्ययाद्वारे नष्ट केली आणि निरर्थक जुन्या रूढी नष्ट करून नीटपणाने लोकांना आकर्षित केले.
लोकांना नेमके भेदक वचन बोलून प्रसंगमान पाहून बोलून आणि उदास वृत्ती असल्याने उठून जाऊ लागले. त्यांचे वर्तन पाहून लोकांना त्यांची चटक लागली. नाना मार्ग सोडून त्यांना लोक शरण येतात. पण अशी उदासीन व्यक्ती कुठे आढळत नाही. एका ठिकाणी सापडत नाही. त्याचा वेश हीन दिनासारखा असतो. तो उदंड गुप्त रूपाने कार्य करतो. भिकाऱ्यासारखे त्याचे स्वरूप असतं. यशकीर्ती प्रतापाने सीमा सोडून दिलेली असते. ठाई ठाई भजन लावतो आपण तिथून निघून जातो. मत्सर, मतामतांचा गोंधळ होऊ देत नाही. गुहेमध्ये जाऊन राहतो. तिथे त्याला कोणीच पाहत नाही आणि तिथे बसून सगळ्यांची चिंता नेहमी वाहतो. असं निस्पृह व्याप लक्षण समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127