कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात एक धक्कादायक बातमी आहे. महामारीमुळे भारतात दररोज पाच हजार लोकांचा मृत्यू होईल, असा धक्कादायक निष्कर्ष वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आला आहे. सध्या भारतात सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढते आहे. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे
सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये आता दररोज तीन लाखांहून अधिक बाधितांची भर पडते आहे. गेल्या चार दिवसात देशात 13 लाख नव्या बाधितांची भर पडली असून, शनिवारी जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. ही आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सध्या जो कोरोनामुळे मृतांचा आकडा दोन ते तीन हजारांच्या दरम्यान आहे, तो पुढच्या महिन्यापासून पाच हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे, असे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. एप्रिल ते जुलै या तीन -चार महिन्यांच्या काळात जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक
जिथे समस्या असते, तिथे समस्या सोडविण्यासाठी तोडगा नक्कीच असतो. विद्यापीठाच्या अभ्यासातही ही समस्या सोडविण्यासाठी उपाय सांगण्यात आला आहे. देशातील कोरोनाचे आगामी संकट टाळायचे असेल तर लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढवायला हवा. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी, तसेच सरकारने देशातील लसींचा पुरवठा वाढवायला हवा. लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण करायला हवे, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याद्वारे पुढची हानी टाळता येईल, असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.