(रत्नागिरी)
मिऱ्या-नागपुर महामार्गाचे कासवाच्या गतीने काम चालू आहे. या कामामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वत्र रस्ते खोदून ठेवून त्यावर आता मोठ-मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामधूनच वाहने चालवावी लागत आहे. यात संध्याकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होत असते. मात्र आज संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास खेडशी बस स्टॉप जवळ रत्नागिरी आगाराची एसटी बस बंद पडल्याने दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या.
एका बाजूचे काँक्रिटीकरणचे काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे बंद पडलेली बस बाजूला ही करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु खेडशी येथील स्थानिक तातडीने मदतीला धावून आले. स्थानिकांच्या मदतीने ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र रत्नागिरी एसटी महामंडळाच्या चांगल्या दिसणाऱ्या बसही भर रस्त्यात बंद पडत असल्याने आता अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
खेडशी येथील बस बंद पडली आहे. बस दुरुस्त करण्यासाठी माणूस पाठवण्यात आला आहे. अशी माहिती “रत्नागिरी 24 न्युज”शी बोलताना रत्नागिरी डिएम संदीप पाटील यांनी दिली.