(लाईफ स्टाईल)
महाभारतानुसार मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु कोणताही मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. फार कमी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जगतात. महाभारतातील एक प्रसंगानुसार, राजा धृतराष्ट्र महात्मा विदुरला मनुष्याचे आयुष्य कमी होण्यामागचे कारण विचारतात. तेव्हा विदुर मनुष्याचे आयुष्य कमी करणाऱ्या 6 दोषांची माहिती राजा धृतराष्ट्रला सांगतात. महाभारतानुसार यमदेवानेच शाप मिळाल्यामुळे मनुष्य बनून विदुराच्या रुपात जन्म घेतला होता. महात्मा विदुराने राजा धृतराष्ट्रला मानवाचे आयुष्य कमी करणारे 6 दोष सांगितले.
धृतराष्ट्र महात्मा विदुरला विचारतात –
शतायुरुक्त: पुरुष: सर्ववेदेषु वै यदा।
नाप्नोत्यथ च तत् सर्वमायु: केनेह हेतुना।। (महाभारत, उद्योग पर्व 37/9)
अर्थ – सर्व वेदांमध्ये मानवाचे आयुष्य 100 वर्षांचे सांगितले आहे. तर मग कोणत्या कारणामुळे मनुष्य स्वतःचे आयुष्य पूर्ण जगू शकत नाही.
विदुर सांगतात की –
अतिमानोअतिवादश्च तथात्यागो नराधिप।
क्रोधश्चात्मविधित्सा च मित्रद्रोहश्च तानि षट्।।
एत एवासयस्तीक्ष्णा: कृन्तन्यायूंषि देहिनाम्।
एतानि मानवान् घ्नन्ति न मृत्युर्भद्रमस्तु ते।।
(महाभारत, उद्योगपर्व 37/10-11)
अभिमान/अहंकारी-
विदुराने राजा धृतराष्ट्राला सांगितले की, जे लोक अत्यंत अभिमान, अंहकारी असतात ते कधीच शंभर वर्षे जगत नाहीत. अहंकार माणसातला चांगुलपणा संपवतो. यामुळे शारीरिक अशक्तपणा निर्माण होतो. अंहकारामुळे चांगले आणि वाईट यामधले आंतर कमी होते. यामुळे वाईट मार्गाला अहंकारी व्यक्ती जातात.
जास्त बडबड करणे-
जे लोक विनाकारण जास्त बडबड करतात, शांत बसु शकत नाहीत, अशा लोकांचा मृत्यू लवकर होतो. जास्त बोलल्यामुळे शरिरातील उर्जा कमी होते. जर आपण कामापुरतेच बोललो तर शरिरातील उर्जा कमी खर्च होते. आयुष्य वाढते, असे विदुर नितीमध्ये सांगितले आहे.
क्रोध म्हणजेच राग –
मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू क्रोध आहे. रागात आल्यानंतर मनुष्य त्यावेळी केलेल्या कर्माचे परिणाम विसरून जातो, यामुळेच त्याचे पतन होते. श्रीमद्भागवत ग्रंथानुसार शरीराच्या अंतापुर्वी जो व्यक्ती क्रोधावर विजय प्राप्त करतो, तो आयुष्यात योगी आणि सुखी होतो. क्रोधाला नरकाचे द्वार मानले जाते. याचा अर्थ क्रोधी मनुष्याला नरकात जाण्यासाठी इतर कोणत्या मार्गाची आवश्यकता भासत नाही. क्रोध त्याला नरकाकडे घेऊन जातो. क्रोधाच्या दुष्परिणामांमुळे आयुष्य कमी होते.
त्यागाचा अभाव –
त्यागाचा अभाव असल्यामुळेच रावण, दुर्योधन यांचे पतन झाले. संसारिक सुख मनुष्याचे आयुष्य कमी करते आणि या सुखांचा त्याग आयुष्याची वृद्धी करतो. मनुष्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, आपण या संसारात काही घेण्यासाठी नाही तर इतरांना सुख देण्यासाठी आलो आहोत. ज्या लोकांच्या मनात त्यागाची भावना नसते, त्यांना लवकरच मृत्यूला सामोरे जावे लागते.
स्वार्थ –
स्वार्थ अधर्माचे मूळ कारण आहे. जगामध्ये होणाऱ्या अनेक युद्धाचे कारण स्वार्थ (भूमी, धन किंवा स्त्री)च आहे. स्वार्थी मनुष्य स्वतःचे काम साध्य करून घेण्यासाठी कोणतेही पाप करण्यास मागेपुढे पाहात नाही. जगातील सध्याच्या वर्तमान स्थितीकडे पाहिल्यास स्वार्थामुळे संपूर्ण जगात पाप कर्म वाढत असून चारही दिशांना अशांतता पसरलेली आहे. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ असेल त्याचे आयुष्य कमी होते.
मित्रद्रोही –
मित्रद्रोही म्हणजे स्वतःच्या मित्राला धोका देणाऱ्या व्यक्तीला शास्त्रामध्ये अधम मानण्यात आले आहे. मनुष्य जीवनात मित्राचे खूप महत्त्व आहे. मित्रत्वामुळे एका नवीन शक्तीचे निर्माण होते, ज्यामुळे शत्रूही भयभीत होतात. पतनाकडे जाणाऱ्या अनेक पुरुषांचा उद्धार मित्रांनी केला आहे. मित्रद्रोही मनुष्याचे आयुष्य नरकासमान असते. मित्रद्रोही नावाच्या दोषापासून दूर राहण्यासाठी त्याग आणि इतरांचे हित करणे परम आवश्यक आहे.
@ यशवंत नाईक