(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील चर्मालय ते कोकणनगरपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. मात्र, अनधिकृत, बेकायदेशीररीत्या उभारलेल्या बांधकामांवर रत्नागिरी नगर परिषदकडून कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोकणनगर येथील रस्त्याच्या एका बाजूला अनधिकृत शेड आणि बांधकामे आहेत, यामध्ये हॉटेल, चायनीज सेंटर्स, चिकन सेंटर, तसेच बेकरी व्यवसायासह इतरही व्यवसाय सुरू आहेत. या अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामाबाबत येथील रहिवाशांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही ही बांधकामे हटविण्यात आलेली नाहीत.
नगर परिषदेने चर्मालयापासून ते कोकणनगरपर्यंतच्या सर्व अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामधारकांना गतवर्षी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला आठ महिने उलटले तरी अनधिकृत बांधकामधारकांकडून त्याला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्या नंतरही नगर परिषद प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.