जय जय रघुवीर समर्थ. लोकांनी आपली स्तुती करावी किंवा आपली निंदा करावी, आपल्या विरुद्ध जावे; काहीही असलं तरी आपलं आपल्याला समाधान मिळेल असं करावं. समाधानाने समाधान वाढते. मैत्रिने मैत्री जोडली जाते. चांगुलपणा क्षणभरामध्ये नाहीसा होतो. अरे कारे असे शब्द लोकांमध्ये ऐकायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपले निकामीपण समजते. चातुर्यामुळे मन शृंगारले जाते, वस्त्रामुळे शरीर शृंगारले जाते, दोन्हीमध्ये थोर कोणते पहा बरं! बाहेरचा आकार शृंगारला, त्यामुळे लोकांच्या हाताला काय लागलं? पण चातुर्यामुळे अनेकांचे नाना प्रकारे रक्षण केलं.
चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले वस्त्र नेसावे, सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी लोकांची वासना किंवा इच्छा असते; पण लोकांसाठी तनमनाने झिजावे त्यांच्याकडून चांगल असं म्हणून घ्यावं असं करण्यासाठी तुम्हाला त्रास घ्यावा लागेल. लोकांचं काम आडलेलं असेल तर ते काम सहजपणे होईल अशा प्रकारे वागायला लागतं, म्हणून दुसऱ्यांना सुखी करावं. त्या त्या सुखामुळे आपण सुखी व्हावे. दुसऱ्यांना जर कष्ट दिले तर आपल्यालाही कष्ट होतील हे स्पष्ट आहे. प्राणीमात्रांनी हे ओळखले पाहिजे. हे समजून जे वर्तन करतात तेच भाग्य पुरुष आहेत. याच्यापेक्षा वेगळे राहिलेले असतील ते करंटे पुरुष.
जितका व्याप तितके वैभव, वैभवासारखे वर्तन हे समजलं पाहिजे. त्याचा उपाय स्पष्टच आहे. आळसामुळे कार्यभाग नासतो, विचार हा केल्याने होतो, जे स्पष्ट दिसते तेही ज्याला समजत नाही त्याला शहाणं कसं म्हणायचं? मैत्री करता कृती केली जाते, मदत केली जाते. वैर धरले तर मृत्यू ओढवतो. हे बोललेलं सत्य आहे की असत्य? ओळखा. आपल्याला शहाणं न करणे, आपलं हीत आपण न समजणं, लोकांमध्ये मैत्री न राखणं, वैर करणं अशा प्रकारचे ज्ञान असलेले लोक आहेत त्याला अज्ञानी म्हणावे. त्यांच्यापाशी समाधान कोणाला मिळेल? आपण एकटे असतो. सृष्टीमध्ये सर्वांशी भांडत राहिले तर अनेक लोकांमध्ये एकट्याला यश कसे मिळेल? अनेकांच्या मुखातून आपले गुण गायले जावेत. अनेकांच्या मनामध्ये आपले नाव कोरले जावे. उत्तम गुणांनी सगळ्या जगामध्ये प्राणीमात्राला सुख द्यावे. लोकांना शहाण करावं. पतित असतील त्यांना पावन करावं. सृष्टीमध्ये भगवद भजन वाढवावं. असा उपदेश समर्थ करीत आहेत. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास षष्ठ समाप्त जय जय रघुवीर समर्थ.
दशक 14 समास युगधर्म निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. नाना वेश, नाना आश्रम या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे. तेथे त्रैलोक्यातील सगळेजण विश्राम करतात. देव, ऋषी, मुनी, योगी, नाना तापसी, वितरागी, पितर, अतिथी, अभ्यागत हे गृहस्थाच्या घरच्या अन्नाचे अधिकारी असतात. गृहस्थाला अन्नदान हा मुख्य धर्म होय. गृहस्थाश्रमी निर्माण झाले त्यांनी आपापले कार्य केले मात्र सर्वांना गृहस्थांच्या घरी आश्रय मिळाल्याने गृहस्थधर्माला कीर्ती प्राप्त झाली. त्यामुळे सर्वांमध्ये गृहस्थाश्रम हा उत्तम आहे परंतु तिथे स्वधर्म आणि भूतदया असायला हवी. गृहस्थधर्माच्या अंतर्गत अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतीग्रह ही सहा कर्मे चालतात. वेदोक्त क्रिया आचरण केली जाते. सर्व प्राणीमात्रांशी मधुर शब्दांनी बोललं जातं. अशाप्रकारे शास्त्रोक्त, अलौकिक भक्तीमार्गाचे आचरण म्हणजे हा गृहस्थाश्रम.
पुरश्चरण केले असता शरीराला क्लेश होतात. कठोर व्रत केले असता सायास होतात. जगदीशापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. काया वाचा जीव प्राण भगवंतासाठी कष्ट व्हावे अशा प्रकारचं मनाने घेतले ते भजनमार्गी असतात. अशा प्रकारचा भगवंताचा भक्त असतो तो मनातून विरक्त झालेला असतो. संसार सोडून देवासाठी काम करत असल्याने तो मुक्त झालेला असतो. अंतरमनापासून वैराग्य असेल तेच महाभाग्य जाणावे. आसक्तीसारखे अभागीपण दुसरे नाही. राजे राज्य सोडून गेले, भगवंतासाठी हिंडले, कीर्तीरूपाने भूमंडळावर पावन झाले असं वर्णन समर्थ करीत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127