(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
रत्नागिरी-देवरुख मार्गावरील पांगरी घाटात असलेल्या स्टोन क्रशरने घाटाची पूर्णतः वाट लावली आहे. या क्रशरमध्ये दिवसाढवळ्या जोरदार सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. काही ठिकाणी धूळ व कच रस्त्यावर पसरली आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांनाही धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. असे असले तरी प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.
पांगरी घाटात गेले अनेक वर्षे स्टोन क्रशर सुरू आहे. क्रशर व्यवसायिकांने डोंगर पूर्ण पोखरला आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सध्या तर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात दिवसाढवळ्या ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. काही ठिकाणी स्फोटाच्या ब्लास्टमुळे घराला तडे गेले आहेत. ब्लास्टमुळे निर्माण होणारी धूळ, खडी, कच हवेमध्ये पसरत असल्याने हवेतील धुरळ्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील झाडांवर विशेषतः आंबा, काजू झाडांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या क्रशरबाबत तक्रारी आल्यानंतरही संबधित क्रशर व्यवसायिकावर तातडीने कारवाई करणे गरजेचे असताना ही प्रशासन इतकं मेहरबान का झालेय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
क्रशरमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. सुरुंग लावण्यास परवानगी नसतानाही जोरदार सुरुंग लावण्यात येत आहेत. काही वेळा तर वाहने थांबवून सुरुंग लावला जात आहे. लाल झेंडा घेऊन या ठिकाणी माणसे उभी केली जात आहेत. रस्त्याचे काम सुरू आहे, जरा थांबा, असे सांगितले जाते. सध्या तर सगळी धूळ व कच रस्त्यावर आलेली दिसत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूलाही मोठे मोठे खडीचे ढीग पहायला मिळत आहेत. वळण भागात ही धूळ व कच आल्याने लहान- मोठे अपघात होत आहेत. मोटारसायकल चालवणे धोकादायक बनले आहे.
दरवर्षी पांगरी घाट कोसळतोय..
पावसाळ्यात दरवर्षी पांगरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे काहीवेळी हा मार्ग बंदही असतो. मुळात तेथे होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे हा डोंगराला भेगा पडतात. नंतर त्या दरडी कोसळतात, अशीही चर्चा सुरू आहे.
पांगरी घाट बोडका केल्याची दुसऱ्या घाटातून दिसतात दृश्य
या क्रशरने जोरदार ब्लास्टिंग करून पांगरी घाटाचा डोंगर बोडगा केला आहे. हा घाट हळूहळू ढासळतोय की काय असे काही क्षणासाठी वाटतं असते मात्र क्रशरने जोरदार ब्लास्टिंग करून या घाटाची वाट लावलेली दिसून येते. पांगरी डोंगर कशा पद्धतीने बोडका करण्याचे कामकाज सुरू आहे याची दृश्य महामार्गावरील निवळी घाटातून स्पष्ट दिसतात. या क्रशरवर आता जिल्हा प्रशासन तोंडावर बोट ठेवून शांत राहणार की कारवाई करनार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खडीतून तयार होणाऱ्या कचचा भरावासाठी वापर
या स्टोन क्रशरच्या काही अंतरावर जुनी स्टोन क्रशरची मोकळी जागा आहे. या क्रशर मालकाने अनोखी शक्कल लढवून जुन्या स्टोन क्रशरच्या मोकळ्या भागात कच टाकून भराव केला आहे. तिथेही ही पांढऱ्या धुळीचे लोट उसळतात. तसेच दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडतात. मात्र या क्रशर मालकाला कचचा वापर भरावासाठी करण्यास सांगितले तरी कोणी? असा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे.