जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनाची लक्षणे समर्थ सांगत आहेत. खरे-खोटे एकत्र केले की खरे वाटते, मात्र खुरखुर खरखर होऊन खोटेपण खुंटले. खोटे असल्याने खोटेपणाने गेले. खोटे म्हणून शहाण्यांनाही उमगत नाही. शास्त्रार्थ श्रुतीचा बोध होत नाही. त्यांच्यासाठी पोपट किंवा मैनेसारखा त्यांचा शब्द गोड होतो. मात्र वरवरच्या गोष्टींनी हर्ष हर्षाने हसला, हा हा हो हो शब्दांनी भुलला मात्र त्याचे परलोकीचे हित होत नाही… त्यासाठी परमात्म्याला पहावे, डोळ्यांचा डोळा व्हावे, अलक्षाकडे लक्ष लागावे.. आणि विहंगम मार्गाला जावे. शरीर आणि अंतरात्मा क्षोभ करतो, क्षमेमुळे मात्र शांत होतो, असा अंतरात्मा सर्वांच्या ठायी आहे.. अशा तऱ्हेने कीर्तनाची विविध लक्षणे शब्दांच्या विविध मजेदार हरकती करीत समर्थांनी सांगितली आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 14 समास 5 हरिकथा लक्षण निश्चय नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता, त्याचे उत्तर सावध होऊन ऐकावे. हरिकथा कशी करावी? तिच्यामध्ये रंग कसा भरावा? ज्यामुळे रघुनाथ कृपेची पदवी प्राप्त होऊ शकेल.. असा त्यांचा प्रश्न होता. सोन्याला सुगंध आला, ऊसाला गोल, रसाळ फळ लागली, तर जी अपूर्वता निर्माण होईल त्याप्रमाणे हरिदास असेल आणि तो विरक्त असेल ज्ञाता असेल जाणणारा असेल आणि प्रेमळ भक्त असेल विद्वान असेल आणि वाद न करणारा असेल तर तीही एक अपूर्वता म्हणावी लागेल. रागाचे ज्ञान असलेला तालाचे ज्ञान असलेला, सगळ्या कला असलेला, ब्रह्मज्ञानी, निराभिमानी, अभिमान न बाळगणारा असेल तर ती देखील अपूर्वता आहे. जराही मत्सर नाही मनाने सगळ्या गोष्टी जाणतो, अंतरनिष्ठ आहे, तो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे.
तीर्थक्षेत्रामध्ये जयंती वगैरे नाना पर्व साजरी होतात, जेथे सामर्थ्य रूपाने देव वस्ती करतो, त्या तीर्थाला जे मानत नाहीत, शब्दज्ञान म्हणून मिथ्या म्हणतात त्या पामरांना श्रीपती कसा जोडता येईल? संदेह असल्यामुळे निर्गुण गेले, ब्रह्मज्ञानामुळे सगुण नेले आणि दोन्हीकडे अभिमान असल्यामुळे व्यर्थ गेले. उत्सवमूर्ती पुढे असेल तर जे निर्गुण कथा सांगतील ते प्रतिपादन करून पुन्हा उलटे बोलतात ते पढतमूर्ख आहेत. ज्याच्यामुळे दोघांच्या मनात अंतर निर्माण होईल अशा प्रकारची हरिकथा केली जाऊ नये.
हरीकथेची लक्षणे आता ऐका. सगुण मूर्तीच्या पुढे भक्ती भावपूर्णक कीर्तन करावे. देवाची नाना ध्याने, प्रताप, कीर्ती वर्णन करावी. रसाळ असं गायन करावं आणि कथा सांगावी की ज्यामुळे सर्वांच्या हृदयात प्रेम सुख वाढीस लागेल. कथा सांगण्याची खूण म्हणजे सगुण वर्णन असेल तिथे निर्गुणाचं वर्णन आणू नये. समोरच्याचे दोष गुण कधीही सांगू नयेत. देवाचे वैभव वर्णन करायचं. नाना प्रकारे महत्त्व सांगायचं. सगुणावरती भाव ठेवून हरीकथा करायची. लोकांची लाज सोडून, धनाची आस्था सोडून, नित्य नवी कीर्तनाची आवड धरायची. देवळातील सभा मंडपामध्ये नम्र होऊन निषंकपणे देवापुढे लोटांगण घालायचे. टाळ्या वाजवायच्या. नृत्य करायचं. वाणीने नामघोष करायचा. देवाची कीर्ती वर्णन करण्यासठी काही लागत नाही म्हणून समोरील देवाची कीर्ती वर्णन करायची.
जिथे सगुण मूर्ती नसेल, श्रवण करण्यासाठी साधूजन असतील तिथे अद्वैत निरूपण अवश्य करावे आणि मूर्ती पण नाही आणि सज्जनपण नाहीत भाविक जन बसलेले असतील तिथे परमार्थाची प्रस्तावना असलेले वैराग्याचे आख्यान लावावं. शृंगारिक नवरसिक यामध्ये एक सोडावं. स्त्रियांचे कौतुक वर्णन करू नये. स्त्रियांचं लावण्य वर्णन केलं तर विकारांची बाधा होते. श्रोत्याचे धारिष्ट कमी होते आणि श्रोता चळतो म्हणून ते त्यागावे. जे साधकांना बाधक आहे ते त्या गावे. स्त्रियांचं ध्यान करू नये. स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान केल्यामुळे मन कामुक होते, त्यामुळे मग ईश्वराचे ध्यान कसे आठवेल? स्त्रीचे वर्णन केल्यावर सुखावला लावण्याचा भरीमुळे भरला तो ईश्वरापासून दूर गेला, असं जाणावे. अशी हरिकथा निरूपणाची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127