(मुंबई)
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार हैं, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली होती. यावरून शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रियांका यांचा उल्लेख ‘चतुरताई’ असा केला आहे. तसेच शीतल म्हात्रे यांनी खोचक भाषेत प्रियांका चतुर्वेदी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. खासदारकी संपत आल्याने पुन्हा खासदारकी मिळावी यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत? असा प्रश्न शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत की, “प्रिय चतुरताई, तुम्ही खासदारकी कशी मिळवली हे खरंतर लोकांना सांगितलं पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेचा संबंध नसतानाही आपण खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे. ‘बुलंदी’मधील संवाद तुम्हाला माहिती नसेल. “बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुँह में हात डालने” अशीच तुमची परिस्थिती झाली आहे. काहीही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत, हे लोकांना सांगा. परत खासदारकी मिळावी, यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात? आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी खासदारकी द्या, असं सांगणाऱ्या तुम्ही. त्यामुळे कुणाला बोलताय, याचा विचार करा आणि भान ठेवा,” अशी सणसणीत टीका शीतल म्हात्रे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर केली आहे.
खासदारकीची टर्म संपल्यावरची
चतुरताईंची तडफड आता दिसू लागलीय…
दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत???
आणि मागच्या आठवड्यात परत
खासदारही मिळवायला कुणा कुणाकडे लोटांगणं घातली ते सांगायला लावू नका … #गोष्टचतुरताईंच्याखासदारकीची #मागच्यादाराचीखासदारताई pic.twitter.com/wNmguyzrq6— sheetal mhatre (@sheetalmhatre1) May 9, 2024
प्रियांका चतुर्वेदी या ठाकरे गटाच्या खासदार असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. “गद्दार गद्दारच राहणार. एक चित्रपट आला होता दिवार. त्यामध्ये अमिताभ बच्चन हात दाखवतो त्यावर लिहिलेलं असतं मेरा बाप चोर हैं. तसंच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार हैं,” अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली होती.