(रत्नागिरी)
तालुक्यातील गोळप येथे दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीला आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी – पावस मार्गावरील गाेळप येथे मुकादम यांच्या बागेत ही घटना घडली आहे. दाेघे भाऊ सहा महिन्यांपासून बागेत रखवालीचे काम करत हाेते. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला बागेत दाेघांचे मृतदेह आढळले. दाेन्ही भावांच्या डाेक्यात धारधार शस्त्राने वार करत आणि डाेक्यात दगड घालून खून केल्याचे दिसून आले.
रत्नागिरी-पावस बायपास मार्गावर गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लीम मोहल्ला येथे मुदस्सर मुकादम यांच्या मालकीची आंबा कलमांची बाग आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भक्त बहाद्दूर थापा (वय ६०), ललन बहाद्दूर थापा (वय ५५) (मूळ रा.नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) येथे रखवालदार म्हणून कामाला होते. बागेच्या सड्यावर आंब्याच्या झाडाच्या बुंध्यावर मचान करून हे दोघेही सख्खे भाऊ तेथेच रहात होते. आंबा पीक आल्यानंतर त्याचे संरक्षण करण्यासाठी दोघेही रात्रभर चांगला पहारा देत होते.
आज सकाळी मुदस्सर मुकादम यांचा एक कामगार बागेत आला असता त्याला दोघे थापा मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्याने याबाबतची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यानंतर मुदस्सर मुकादम आंबा बागेत दाखल झाले. यावेळी भक्त, ललन थापा हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात आंबा झाडाच्या बुंध्याखाली मृतावस्थेत पडलेले होते. त्यानंतर श्री.मुकादम यांनी या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना दिली.
पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेहांचा पंचनामा करुन ताे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले होते. घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी सर्च केला असून पोलिसांना परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तर श्वान पथकही हत्या करणार्यांचा माग काढण्यासाठी आंबा बागेच्या बाहेर गेलेले नाहीत. परिसरातच श्वान घुटमळत राहिल्याने हल्लेखोर नेमके कोणत्या दिशेने पळून गेले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील रक्त, मातीचे नमुने ताब्यात घेतले आहेत. एकाच वेळी दोघांची हत्या झाल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.