(खेड)
डंपर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळून दुचाकीला धडकल्याने दुचाकी डंपरखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अरुण रामदुलर जैस्वाल (३७, रा. सातपूर, नाशिक) असे चालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे झाला.
अरुण जैस्वाल हे मेडिकल रिप्रेसेन्टेटिव्ह म्हणून काम करत होते. ते दुचाकीवरून (एमएच ०८ बीबी ५९०१) खेड येथून चिपळूणच्या दिशेने जात होते. महामार्गावरील खोपी फाटा येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला ते आले असता चिपळूणहून खेडकडे जाणारा कोकण रेल्वेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर (एमएच ०६, बीडी ०९८२) अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळला त्यामुळे डंपरची दुचाकीला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी डंपर खाली गेली. डंपरच्या चाकाखाली दुचाकीसह सापडल्याने अरुण जैस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली असणारी नाणीजधाम येथील श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद खेड पोलिस स्थानकात करण्याचे काम उशीरपर्यंत सुरू होते.