(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यात जल जीवन योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या अनेक तक्रारी आता समोर येत आहे. वायंगणेतील नवालेवाडी येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाचे कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे प्रकार उघड होत आहे. या योजनेच्या माध्यमातून भरमसाठ खर्च करून काम निकृष्ट दर्जाची केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निकृष्ट दर्जाची कामे प्रशासनाच्या निदर्शनास येऊन सुद्धा तसेच शासन दप्तरी अनेक तक्रारी असूनही कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वायंगणे येथील नवालेवाडीत जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. शासन नियमाप्रमाणे काही फुटांवर खोदाई केल्यानंतर पाईप लाईन टाकणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करताच येथील कातळावरून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. योजनेंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. अशा निकृष्ट होत असलेल्या कामांमध्ये चौकशी न करताच जिल्हा प्रशासन झोपा काढतय का? असा प्रश्न उपस्थित होत असून या निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामांमध्ये बड्या अधिकाऱ्यांपर्यंत लिंक असण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त अधिकाऱ्यांना वरिष्ठ घालतायत पाठीशी
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग जि.प चे उप अभियंता श्री. आर एल लठाड यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आल्या होत्या. त्यानुसार श्री लठाड यांचे बदलीचे आदेश काढण्यात आले. परंतु बदलीचे आदेश असताना ही अद्याप त्यांची बदली झालेली नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहेत का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बदलीच्या आदेशाचे काय?
वायंगणे येथील निकृष्ट काम हे एक नमुना आहे. मात्र तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? वादग्रस्त अधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाकडून बदलीचे आदेश काढले जातात. परंतु वादग्रस्त अधिकारी पुन्हा त्याच खुर्चीवर रुबाबात कार्यरत असल्याचे पाहायला मिळतात. बदलीचे आदेशाचा दिखाऊपणा करून जिल्हा प्रशासन नेमकी कोणती भूमिका बजावत आहे? बदलीच्या आदेशाचे झाले तरी काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक
या प्रकरणाबाबत आता माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. योजनेचे वरिष्ठ अधिकारी यांनी कधी कुठे भेटी दिल्या, काय कार्यवाही केली याबद्दल माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे रत्नागिरी जिल्ह्याकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. याबाबत आर टी आय अंतर्गत माहिती मागवली जाणार आहे. अशी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे.
निकृष्ट दर्जाची अनेक प्रकरणे; अधिकारी वर्ग दाद देईना
संगमेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या विभागातून निकृष्ट दर्जाची अनेक प्रकरणे यापूर्वी देखील उघड झालेली आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने, सामाजिक कार्यकर्त्यांचे वतीने व गावातील दक्ष नागरिकांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावाही सुरू असतो. मात्र प्रशासकीय अधिकारी वर्ग कोणालाच दाद देत नसल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांच्या अशा विविध तक्रारी येत असल्याने नागरिकांमधूनही आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.