(लांजा)
तालुक्यातील दोघा सख्ख्या भावांचा नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आजणारी येथील काजळी नदीत घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंजणारी नांदिवली गावच्या सीमेवर राहणारे प्रमोद नारायण शिंदे (वय २५) आणि मनीष नारायण शिंदे (२२) हे दुपारी ४.३० वाजता काजळी नदीवर मुळे शोधण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे मामा पांडुरंग धोंडू शिंदे आणि बहीण कल्याणी दिनेश पडियार या देखील होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रमोद शिंदे आणि मनीष शिंदे हे दोघे भाऊ मुळे शोधण्यासाठी काजळी नदीपात्रातील खोल डोहाच्या ठिकाणी उतरले. मात्र, खोल डोहात गेल्यानंतर यातील मनीष शिंदे हा बुडाला. लहान भाऊ मनीष हा डोहात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद हा त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र, दुर्दैवाने तो देखील डोहात बुडाला. आपले दोन्ही भाचे डोहात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मामा पांडुरंग शिंदे यांनी आरडाओरडा केला. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भाऊ नदीतील खोल डोहात पूर्णतः बुडाले होते.
आंजणारी आणि वेरळ गावच्या सीमेवर असणाऱ्या वेरळ स्मशानभूमीनजीक काजळी नदीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. दोघा भावांचा शोध घेण्यासाठी वेरळ येथील वसंत गजबार आणि त्यांचे सहकारी नदीपात्रात उतरले. दोन्ही भाऊ डोहातील चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन्ही भावांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकाकुळ वातावरण आहे. प्रमोद आणि मनीष यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता दोन भाऊ गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.