(चिपळूण)
फिरायला जायचे आहे, सामाजिक कार्यक्रमाला जायचे आहे, असे विविध कारणे देऊन चुलत मामीने अल्पवयीन भाचीला गैरमार्गाला लावले आणि त्यातून पैसे कमावल्याचा संतापजनक प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी काहीजणांचा शोध घेतला जात आहे. यातील दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिपळूण शहराला लागून असलेल्या खेर्डी परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीने स्वतः यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी खेर्डी येथील साक्षी (नाव बदलले आहे) ही ३२ वर्षीय महिला, अभिजित पवार (२५, खेड) यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोघांचा संशयितांचा शोध सुरू आहे. साक्षी खेर्डी येथे भाड्याने राहते. तिने आपल्या अल्पवयीन भाचीला जवळ केले. त्या मुलीला वेगवेगळी आमिषे दाखवून आणि कारणे सांगून आपल्याबरोबर नेण्यास सुरुवात केली.
तिच्या घरातही कधी फिरायला जायचे आहे, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाला जायचे आहे असे सांगून त्या मुलीला बरोबर घेऊन जात होती. मात्र बाहेर घेऊन गेल्यानंतर ती त्या मुलीला गैरमार्गाला लावत असे. या प्रकाराला ती प्रचंड कंटाळली आणि तिने थेट चिपळूण पोलिस स्थानकात धाव घेऊन कैफियत सांगितली. पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई सुरू केली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या प्रकरणी तपास करत आहेत. भा.दं.वि.सं. कलम ३७६ (२) (जे), ३७०,३६६ (अ), सह बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२, सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधि- १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिपळूणबाहेरही घेऊन जाण्याचा प्रकार
दोन ते तीन महिने हा प्रकार सुरू होता. त्या अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रांच्या हवाली करून त्यातून पैसे कमावण्याचा व्यवसायच मामीने सुरु केला होता. त्यात आणखी दोघे सहभागी आहेत. मुलीला रत्नागिरी, खेड, लोणावळा अशा ठिकाणी अत्याचार करण्यात आले.