जय जय रघुवीर समर्थ. रेषेची गुंडाळी केली. अक्षराला काना मात्रा उकार दिले की मग त्याचा शब्द तयार होतो. शब्द एकत्रित केले की श्लोक, गद्य, प्रबंध, वेदशास्त्र, पुराण, नाना काव्य निरूपण ग्रंथ, अनुवाद निर्माण होतात; असे किती सांगायचे? नाना ऋषी, नाना मत पाहिली तर असंख्य आहेत. जिथे भाषा लिपी असेल तिथे काय उणे? ऋग्वेदातील वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक, चंपू किंवा काव्याचे भाग, विविध पोथ्यातील प्रकरणांची नावे, नाना समास, नाना पदे, नाना श्लोक, हिंदी काव्यातील छंद, साक्या, दोहे अशी अनेक नामाभिदाने आहेत.
डफ गाणे, माचीगाणे, दिंडीगाणे, कथागाणे, नाना प्रकारचे जलसे, नाना खेळ, ध्वनी, घोष, नाद, रेखा चार वाचांमध्ये पाहायला मिळतात. वाचेच्या रूपातूनही नानाभेद ऐकायला मिळतात. उन्मेष किंवा स्फूर्ती म्हणजे परावाचा. ध्वनी म्हणजे पश्यंती, नाद म्हणजे मध्यमा, आणि शब्द चौथ्या वैखरीपासून नाना शब्द रत्ने उमटतात. अकार-उकार-मकार अर्धमात्राचे अंतर औटमात्रा त्यानंतर सोळा स्वर आणि छत्तीस व्यंजन मिळवून बावन्न अक्षर तयार होतात. नाना भेद, रागज्ञान, नृत्यभेद, तानमान, अर्थभेद, तत्त्वज्ञान, विवेचन या तत्त्वांमध्ये मुख्यतत्त्व म्हणजे शुद्ध सत्व होय.
अर्धमात्रा म्हणजे महातत्व असलेली मूळ माया. लहानथोर नाना तत्त्व मिळून अष्ट शरीर निर्माण होतात. अष्टधा प्रकृतीचे वारं निघून जाते. वारे नसल्यावर जे गगन असतं तसं सघन परब्रह्म. ब्रम्हांडपिंड उभार, पिंड ब्रम्हांड संहार या दोन्ही पेक्षा विमल ब्रह्म अत्यंत वेगळं आहे. सर्व दृश्यपदार्थ जड आहेत. आत्मा चंचळ आहे. विमल ब्रह्म निश्चळ आहे. विवरण करता करता विरून जाते, तात्काळ तद्रूप होते. आपलं सर्व काया वाचा मन संपूर्णपणे मी देवाचा आहे! अशाप्रकारे जड आत्म निवेदनाचा विचार आहे. मूळ माया चंचल असून जगदीश हाच कर्ता आहे. प्राणिमात्र त्याचा अंश आहे. त्याचा तोच आहे. आपल्याशी त्याचा संबंध नाही. चंचल आणि आत्मनिवेदन याचं लक्षण आता सांगितलं.
कर्ता देव आहे. आपण कुठेच नाही. चंचल असते ते स्वप्नासारखे निघून जाते. निश्चल देव निराकार आहे. असा आत्मनिवेनाचा प्रकार जाणावा. चंचळाचं अस्तित्वच नाही तिथे आधी आपण कसे येणार? म्हणून निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक बाळगला पाहिजे. तिन्ही प्रकारे विचार केला तरी आपण नाही. त्यामुळे दुसरेपणही नाही. आपणच नसल्यावर मीपण कुठेच उरत नाही. पाहता पाहता अनुमान केले, कळता कळता कळले आणि हे पाहिल्यावर सर्व बोलणंच संपलं. निवांत झालं. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास पंचम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127