जय जय रघुवीर समर्थ. विवेकी जनहो, आधी प्रपंच नेटका करा, मग परमार्थाचा विवेक धरा. येथे आळस करू नका. प्रपंच सोडून परमार्थ कराल तर त्यामुळे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंचासह परमार्थ चालवाल तर तुम्ही विचारी. प्रपंच सोडून परमार्थ करीत बसलात तर खायला अन्न मिळणार नाही. मग अशा करंट्या माणसाला कसला परमार्थ जमणार? आणि परमार्थ सोडून प्रपंच करत बसला तर तू यमयातना भोगशील. यमयातना भोगायला लागल्याने शेवटी अत्यंत दुःखी होशील. कष्टी होशील. वरिष्टांनी एखादे काम सांगितले, ते करण्यासाठी गेला नाही, घरीच आळसाने बसून राहिला तर त्याला वरिष्ठ साहेब शिक्षा करतील आणि लोक ते पाहत बसतील. त्यामुळे आपले महत्त्व कमी होईल, दुर्जन हसतील, जीवाला उदंड दुःख भोगावे लागेल. हे जसे आहे तसेच शेवटी होईल म्हणून भगवंताचे भजन करावे. याला परमार्थ म्हणतात त्याचा रोकडा अनुभव घ्यावा.
संसारात असून देखील मुक्त असतो तो नेहमी योग्यायोग्य विचार करणाराच बरोबर जाणावा. जो प्रपंचात सावध आहे तोच परमार्थ देखील करेल. प्रपंचात योग्य ठरणार नाही तो परमार्थात देखील खोटा! हे जाणून सावध राहून प्रपंच आणि परमार्थ चालवावा. तसे केले नाही तर नाना दुःखे भोगावी लागतील. पानावरील किडा अगोदर दुसऱ्या पानावर रोवतो नंतरच पाठीमागील पानाचा आधार सोडतो, अशी जीवसृष्टी देखील विचारपूर्वक चालत असते. आणि माणूस असूनही आपण चुकतो, याला काय म्हणायचे? हे जाणून नीट विचार केला पाहिजे. अखंड वाटचाल करावी. पुढे काय होणार आहे याचे अनुमान आधीच करून त्यानुसार उपाय करीत राहावे. माणूस सुखी असला की दक्ष असतो. दुःखात सापडला की त्याचे हाल होतात. हा साधा सरळ विचार आहे जीवनात त्याचा नेहमी प्रत्यय येत असतो. म्हणून जो नेहमी सावधान राहतो त्याचा महिमा थोर, तो धन्य आहे. तोच लोकांचे समाधान करू शकतो.
कर्माचा आळस केला तर अचानक काळाचा घाला पडेल. मग सावरायला अवकाश मिळणार नाही. म्हणून विचारपूर्वक वागणाऱ्या लोकांचा विवेक पहावा, एकाच्या उदाहरणाने दुसरे शहाणे होतात. असे शहाणे झालेले लोक ओळखावेत, गुणवंतांचे गुण घ्यावे, लोकांतील अवगुण पाहून ते सोडून द्यावे. विवेकी माणूस प्रत्येकाची मनोमन परीक्षा करीत असतो. कुणाचे मन दुखवत नाही. सर्व लोकांचा विचार नेहमी करीत असतो. विवेकी माणूस अगदी सगळ्यांसारखा दिसतो. उपयोगी, निरुपयोगी लोकांचे हित तो पाहत असतो. विवेकी माणूस अशाप्रकारे सर्व तऱ्हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवत असतो. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळलक्षण नाम समास प्रथम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127