(संगमेश्वर)
आजच्या स्त्रिया परंपरेच्या चौकटीत किंवा सामाजिक रुढींच्या बंधनात अडकलेल्या नाहीत. त्या विविध क्षेत्रांमध्ये आपले सर्वोत्तम पाऊल पुढे टाकत आहेत, बलवान राष्ट्राच्या उभारणीसाठी त्या पुरुषांबरोबरच योगदान देत आहेत. या महिलांपैकी काहींना त्यांच्या कामाबद्दल वाहवा मिळाली आहे, पण आयुष्यभराच्या संघर्षानंतरच. बहुसंख्य स्त्रियांना ओळख तर सोडाच, विशेषत: त्यांच्या सुरुवातीच्या काळात असो किंवा करिअरच्या शिखरावरच्या क्षणी असो कौतुकाची थाप क्वचितच मिळते. समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रतिभावंत व कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी भारतीय स्त्री शक्ति, चिपळूण शाखेतर्फ़े जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन रविवार ७ एप्रिल रोजी ‘आदिशक्ति गौरव पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त महिलांना विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधण्याची आणि नेटवर्क स्थापित करण्याची संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कार्याला अधिक प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे .हे सर्व पुरस्कार चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम यांच्या हस्ते आणि अर्चना बक्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या बाळाशास्त्री जांभेकर सभागृहात रविवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी संपन्न झाला. सन्मानित करण्यात आलेल्या स्त्री रत्नांविषयी थोडक्यात माहिती.
सौ. नीला विवेक नातू
या मुंबई सारख्या शहरात मोठया झाल्या , विज्ञान शाखेत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व विवाहपश्चात कोकणातील घोणसरे या लहान गावात येऊन येथील जनमानसात स्वतःला सामावून घेतले . खेडेगावातील सर्वसामान्यांना स्वस्तात वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून त्यांनी पुढाकार घेतला, तसेच तेथील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नयेत म्हणून त्यांनी विविध योजना राबविल्या आहेत . समाजासाठी वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहूनही वाचन, संशोधन व लेखन हे त्यांचे छंद त्यांनी जोपासले आहेत . त्यांनी आपल्या लेखनाचा एक चाहतावर्ग जोडला आहे. त्यांचा “लक्ष्मी” हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस पडला आहे . नुकतीच त्यांची “आनंदीबाई रघुनाथराव” ही कादंबरी प्रकाशित झाली आहे . त्यातील अभ्यासपूर्ण मांडणी, सुयोग्य भाषा, व व्यक्तिरेखांच्या मनाचे कंगोरे या गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आदिशक्तिच्या प्रेरणेने लेखन क्षेत्रात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले आहे . लेखन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति चिपळूण शाखेच्या वातीने २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार देऊन त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
सौ.सीमा नितीन यादव
बी.कॉम. शिक्षण पूर्ण करुन सामाजिक कार्यात रममाण होत, समर्पण भावनेने या क्षेत्रात पूर्णवेळ काम करीत आहेत. समाज जीवनात आमूलाग्र बदल करणार्या अनेक प्रकल्पात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे . यामध्ये प्रामुख्याने दिशांतर या एन. जी. ओ. च्या त्या संस्थापक सचिव आहेत व गेलं एक तप त्यात त्या झटून काम करीत आहेत, तसेच परिवर्तन या एन. जी. ओ. मध्ये त्या या आधी डायरेक्टर म्हणून त्यांनी अनेक प्रकल्पात काम केले आहे, तसेच जनशिक्षण संस्थेत डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. हाती घेतलेले समाज हिताचे प्रकल्प त्या नेटाने सुरु करत, चालवितात व त्या प्रकल्पांचा हेतू साध्य करतात . महिला सक्षमीकरणाचे खूप मोठे काम लहान लहान वाड्यांमध्ये त्यांनी यशस्वी रीत्या केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव अनेक खाजगी आस्थापनांकडून व शासन दरबारीही झाला आहे. चिपळूण परिसरातील सामाजिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान खरंच अतुलनीय आहे. आदिशक्ति मातेच्या स्वरुपाची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्वात अनुभवास येते. सामाजिक सेवा क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति चिपळूण शाखेतर्फे २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉक्टर सौ.मनिषा वाघमारे
वैद्यकीय क्षेत्रात एम. बी. बी. एस, डी. एन. बी व नेत्ररोगशास्त्र या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. तसेच मोतीबिंदू शल्यचिकित्सेची आधुनिक प्रणाली त्यांनी आत्मसात केली आहे.वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांचा अनेक क्रीडाप्रकारात सहभाग असतो . त्या एक आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक आहात. धावणे, पोहणे, व सायकलिंग या क्रीडाप्रकारात त्या सातत्याने सराव करतात , अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेत्रदीपक यश मिळवले आहे . त्यांनी १००० किलोमीटर पर्यंत सायकलिंग करण्याची पातळी पार केली आहे. त्यांनी मॅरॅथॉन रनिंग स्पर्धांमध्ये यशस्वीरीत्या सहभाग घेतला आहे व त्या स्पर्धांचे आयोजन ही करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून क्रीडाक्षेत्रात जी नेत्रदीपक कामगिरी सुरु आहे, ती सर्व महिलांना प्रेरणादायक आहे. समाजात क्रीडाप्रेम जागृत करण्यात मोठं योगदान त्या देत आहेत. क्रीडाक्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति चिपळूण शाखे तर्फे त्यांना २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सौ.स्मिता रविंद्र करंदीकर
यांनी कल्याण येथे शिक्षण घेऊन बी. कॉम. पदवी प्राप्त केली आहे. संगीताची त्यांना लहानपणापासूनच आवड आहे, तो छंद त्या आज ही जोपासत आहेत व त्यांनी आपली कलासाधना अखंड चालू ठेवली आहे. संगीत विषयात उपांत्य विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे व आजही त्या शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाट्यसंगीताचे धडे गिरवित आहेत. मराठी नाट्यसंगीताच्या कलेला जीवित ठेवायचा त्यांचा निर्धार संगीतसेवेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. त्यांनी “घन अमृताचा” या संगीत नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. अभंग व नाट्यसंगीताच्या अनेक कार्यक्रमात भाग घेऊन त्याची गोडी नवीन पिढीला पटवून दिली . बालकलाकारांच्या अभंगरंग व नाट्यरंग या कार्यक्रमाची निर्मिती देखील केली आहे. संगीत नाटकांना संगीत मार्गदर्शनही त्या करीत आहेत. त्यांना राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तसेच आंतरराज्य नाट्यस्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळाली आहेत. बालकलाकारांमध्ये संगीताची आवड निर्माण होण्यासाठी व त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात . जुन्या पिढीतला संगीताचा वारसा पुढच्या पिढीला देण्याचे मोठे कार्य त्या खूप मन लावून करीत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कला क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति, शाखा चिपळूण आपणास सन २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मनिषा गणपत रहाटे
शालेय स्तरापासून मनीषा यांना चित्रकलेची खूप आवड. त्यांनी शासनाच्या रेखाकला परीक्षेत उत्तम श्रेणी प्राप्त केली असून जिल्हास्तरीय विविध चित्रकला स्पर्धेत उत्तम यश मिळवले आहे. याबरोबरच त्या एक उत्तम कवी असून महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या कविताना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यानी सिव्हील इंजिनीयरींग विषयात पदवी प्राप्त केली आणि शासनाच्या ग्राम सडक विभागात नोकरी केली. स्वतःचा व्यवसाय करावा असे त्यांचे स्वप्न होते व त्यातूनच त्यांनी महिलांनी चालविलेला पेट्रोल पंप सुरु करुन उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवले. २०१५ साली पेट्रोलपंप मंजूर झाल्यापासुन त्यांनी या प्रकल्पात स्वतःला झोकुन दिले. उद्योग उभारणीत आलेल्या सर्व अडीअडीचणींवर मात केली व आपला उद्योग सुरु ठेवला. या उद्योगात त्यांनी महिलांना रोजगार दिला. खेडोपाड्यातील महिलांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना मदत केली व पुर्णपणे महिलांनी संचलित केलेला व चालविलेला पेट्रोल पंप म्हणून हा उद्योग नावारुपास आणला. या उद्योगाचा जम बसविण्यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली व सर्व संकटांवर मात केली. आज त्यांचा उद्योग अनेक महिलांना रोजगार देत आहे. त्यांना सक्षम करीत आहेत आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करीत आहे. उद्योग क्षेत्रातील या भरीव योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदाना बद्दल भारतीय स्त्री शक्ति चिपळूण शाखा सन २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार देऊन त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
कु.सोनल शिवानंद प्रभुलकर
यांनी प्राणीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व सध्या “सह्याद्री व्याघ्रप्रकल्प या परिक्षेत्रातील रानकुत्रे यांची इकॉलॉजी” या विषयात पी. एच. डी. साठी अभ्यास करत आहात. यांनी वयाच्या १३ व्या वर्षी सर्पमित्र म्हणुन पर्यावरण क्षेत्रात चंचुप्रवेश केला व त्याची व्याप्ती बघता बघता खूप वाढली. गेली १६ वर्ष कुंभार्ली घाट, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी विविध वन्यजीवांसाठी व वनवासी लोकांसाठी विविध प्रकल्पात सहभागी होत असतात . चिकाटीने केलेल्या जनजागृतीमुळे या परिसरातील वनवासी लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत, उदाहरणार्थ चोरटी शिकार बंद करणे, स्थानिकांनी वणव्यास प्रतिबंध करणे, बिबट्या मनुष्य संघर्षाचे बिबट्या – मनुष्य सहजीवनात रुपांतर, जंगल तोडीवर नियंत्रण आणणे. यांनी जनजागृतीसाठी अनेक कार्यशाळा कॉलेज, शाळा, वनवासी वस्त्यांमध्ये घेत असता. तसेच आपण वन्यजीवनाशी संलग्न अनेक विषयांवर शोधनिबंध लिहिले आहेत.
पर्यावरण या क्षेत्रात जे अभूतपूर्व कार्य केले आहे, ते कौतुकास्पद आहे. पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति, शाखा चिपळूण २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सौ. आरती विश्वास खाडिलकर
यांनी मुंबई विद्यापिठातुन अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली व त्यानंतर सातत्याने अभ्यास कायम ठेवत विविध विषयात प्राविण्य प्राप्त केलेत. आपण ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स केला, नंतर त्यांनी बी एड केले , जर्मन भाषेचा कोर्स केला, इंग्लिश विषयात एम ए केले व शालेय व्यवस्थापन विषयात डिप्लोमा प्राप्त केला. तरुण वयात शिक्षण क्षेत्रात रुजु झाल्यावर व त्यांनी आपले कौशल्य सातत्याने विकसित करण्यावर भर दिला . त्याबरोबरच शालेय ॲडमिनिस्ट्रेशन व मॅनेजमेंटचा अभ्यास केला व वरिष्ठांचे सातत्याने मार्गदर्शन घेतले . त्याच फ़ल स्वरुप म्हणजे एक त्या एक यशस्वी शिक्षिका झाल्या आणि त्यांच्या संस्थेने तरुण वयात त्यांची शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली आणि त्यांनी या संधीच सोन केलं . आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केला व विद्यार्थी केन्द्रस्थानी ठेवुन आपल्या सहकार्यांचे नेतृत्व केलं . समर्पित भावनेने काम करण्याच्या वृत्तीमुळे आज शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना आपले करीयर घडविण्यासाठी त्यांची मदत होत आहे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवले आहे व ती साध्य करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्या करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे त्या कौतुकास पात्र आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति, चिपळूण शाखा सन २०२४ चा आदिशक्ति गौरव पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व सन्मानप्राप्त महिलांचे रेणुका उद्योग समुहा तर्फ़े हार्दिक अभिनंदन करण्यात आले .