जय जय रघुवीर समर्थ. मूर्ख एकदेशी राहतो, चतुर जणू अनेक रूपे घेऊन नाना सुखे भोगतो, सर्वत्र पाहतो. जो अंतरात्मा महंत आहे तो संकुचित कसा असेल? तो सगळ्यांना जाणणारा, प्रशस्त विख्यात योगी असतो. कर्ता, भोक्ता, तोच असतो, भूमंडलावर त्याची सत्ता असते. त्याच्यापेक्षा वेगळा जाणकार कोण ते शोधावे लागेल. महन्ताने असे असावे. जीवनाचा अर्थ जाणून घ्यावा. त्याला पाहिले तर सहजासहजी सापडू नये. त्याची कीर्ती उदंड असावी, तो ख्यातनाम असावा. लहानथोर त्याला जाणणारे असावेत. मात्र त्याचा वेश नेहमी एक प्रकारचा नसावा. त्याची कीर्ती काही कमी होत नाही, अनेक लोकांना त्याचे गुपित समजत नाही, पाहिले तर त्याने काय केले कसे केले ते समजत नाही.
नुसते वेश बदलणे हे दूषण, कीर्ती भूषण मात्र खरे भूषण, तो मनन केल्याशिवाय एक क्षण देखील जाऊ देत नाही. त्यागी लोक आपल्या ओळखीचेच असतात. ते सर्वकाळ नित्य नूतन असतात. लोकांनी शोधले तर सापडू शकतात पण लोकांची त्यांना ओळखण्याची इच्छा नसते. त्यागी माणूस कोणाकडे पूर्ण पाहत नाही, कोणाशी जास्त बोलत बसत नाही, एकाच स्थळी राहत नाही, उठून जातो. कुठे जातो ते सांगत नाही, जेथे सांगतो तेथे जात नाही, आपण नेमके कुठे चाललो, काय करतो त्याचा कोणालाही अंदाज येऊ देत नाही. लोकांनी केलेले अंदाज चुकवतो, लोकांना आवडले ते उलथून टाकतो, लोकांनी केलेला तर्क निष्फळ ठरवतो. लोकांना जे पाहण्याचा आदर वाटतो, त्याचा त्याला अनादर वाटतो. ज्या कामांसाठी लोक नेहमी तत्पर असतात त्याची त्याला इच्छा नसते. कल्पना करून करता येत नाही, तर्काने जाणता येत नाही, योगेश्वर कदापि भाविकांना सापडत नाही. त्याच्यात आणि आपल्यात अंतर नसले तरी शरीराने त्याची गाठ पडणे कठीण जाते, कथा कीर्तनाशिवाय तो क्षणभर देखील स्तब्ध राहत नाही.
लोक संकल्प विकल्प करतात ते सगळे निष्फळ होतात लोकांना लाजवतो तेव्हा योगेश्वर प्रगट होतो. अनेकांनी शोधले, अनेकांच्या मनात आल्यासारखे केले की महत्कृत्य साधले असे जाणावे. अखंड एकांत सेवन करावा, सतत अभ्यास करत जावा, मग लोकांच्या सहवासात काळ सार्थक करावा. सर्व उत्तम गुण घ्यावेत, घेऊन लोकांना शिकवावे, मोठे संघटन करावे मात्र गुप्तपणे सर्व करावे. अखंड कामाची लगबग असावी, सर्व जगाला उपासनेला लावावे, मग लोक आपल्याला समजून घेतात आणि आज्ञेचे पालन करतात.
आधी कष्ट मग फळ, कष्टच नसतील ते निष्फळ, विचार नसेल तर ते वाया जाते. अनेक लोक शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, त्यांना जाणून जवळ दूर ठेवावे. अधिकाराप्रमाणे काम होते, अधिकार नसल्यास व्यर्थ जाते हे जाणून विविध लोक शोधावेत. अधिकार पाहून काम सांगावे, त्याचा कामाचा उरक पाहून विश्वास ठेवावा, आपले नेमके महत्त्व राखून असावे. हे अनुभवाचे बोलणे आहे. आधी केले मग सांगितले. पटत असेल तर कोणीही स्वीकारले पाहिजे. महंताने महंत तयार करावे. त्यांच्यात युक्ती, बुद्धी भरावी. अशा जाणकार लोकांना विविध देशांत पाठवावे. असे समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृहवर्तणूक नाम समास दशम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1