(मुंबई)
भाजपाने उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडली आणि महत्वाचे पक्ष फोडून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढल्याने भाजपाबद्दल अनेक जणांना रोष असतानाच किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करीत म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनीच मला उद्धव ठाकरेंशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढण्याचा आदेश दिला होता. सुरुवातीला मी तसे करण्यास नकार दिला. मात्र हा पक्षाचा आदेश आहे असे त्यांनी मला बजावले, त्यामुळे मी तो आदेश मानला.
भ्रष्टाचाराची एकाहून एक प्रकरणं बाहेर काढून विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचं काम सध्या किरीट सोमैया करत आहेत. किरीट सोमैया यांनी ज्यांच्यावर यापूर्वी आरोप केले आणि नंतर ते भाजपसोबत गेले त्यांच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई थंडावली असाही आरोप सोमैया यांच्यावर होत आहे. या सर्व प्रश्नांना किरीट सोमैया यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. किरीट सोमैया म्हणाले आहेत की, तत्कालीन ठाकरे सरकारमधील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावणं ही तेव्हाची राजकीय गरज होती. जर का तसं झालं नसतं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपा, विरोधकांना संपवलं असतं. तसंच, विरोधकांना जेलमध्ये टाकलं असतं असंही किरीट सोमैया म्हणाले. तसंच, आम्ही कुठल्याही भ्रष्टाचारी नेत्याची केस मागे घेतलेली नाही. त्यांच्यावर कारवाई सुरूच आहे. तर सत्तेमधील नेत्यांचाही भ्रष्टाचार समोर आला तर मी ऐकणार नाही, असंही या प्रसंगी किरीट सोमैया यांनी सांगितलं.
मातोश्रीवर अटॅक करा असं तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का? या प्रश्नावर बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, मी पक्षाचा शिस्तबद्ध असा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला ज्या-ज्या वेळी जे-जे सांगितलं ते ते मी केलं आहे. मातोश्रीचा भ्रष्टाचार असेल किंवा हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार हे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं, संशोधनाचं काम माझं होतं. पण हे भ्रष्टाचार बाहेर काढण्यापूर्वी आम्ही राजकीय चर्चा करतो त्यानंतर ‘गो अहेड’ असा पक्षाकडून आदेश आल्यानंतर मी कामाला सुरुवात करतो.
उद्धव ठाकरे यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती. परंतु मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे. तो थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मातोश्री व त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त करण्यासाठी मला हे भ्रष्टाचार बाहेर काढावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश आहे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची संबंधित असेल तो भ्रष्टाचार बाहेर काढायलाच हवा अशी मुंबईसाठी माझी वचनबद्धता आहे आणि तो पक्षाचा निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने मी ते भ्रष्टाचार बाहेर काढले असंही किरीट सोमैया म्हणाले.
राज्यामध्ये मविआचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी नेत्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली होती. या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांच्यावर कारवाई होईल यासाठी पुरेपूर प्रयत्नही केला. किरीट सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबवण्याचा कट रचला होता. त्यावेळी मी आक्रमक होऊन त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली नसती तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी मिळून भाजपा पक्ष संपवला असता. भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात डांबले असते. त्यामुळेच मी त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून त्यांना रोखण्यात यशस्वी झालो. माझ्यावर वाशिम
मतदारसंघात भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर अमित शहा यांचा फोन आला, त्यांनी माझी चौकशी केली आणि लगेचच मला सुरक्षा पुरवली. माझ्या कामाची हीच पोचपावती आहे, असे ते म्हणाले.