(नाशिक)
आज (दि. ०५) दुपारच्या सुमारास नाशिकदिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. नाशिक – दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस त्वरित दाखल झाले होते.
बोलेरो जीपमधून काही भाविक सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतत होते. या बोलेरो जीपचा टायर फुटल्यामुळे चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सध्या प्रखर उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने गाडीचे टायर फुटण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत वाहनचालकांनी वेळोवेळी गाडीच्या टायरमधील हवेचे प्रमाण तपासण्याची आवश्यकता असते. तसेच गाडीचा स्पीड सुद्धा जास्त नसावा आणि जास्त वेळ दूरचा प्रवास करू नये. प्रवासात गाडी थोडावेळ थांबवल्यास गाडीचे इंजिन आणि टायर हे गरम होऊन अपघात होणार नाहीत.