(पुणे)
पोलीस चौकीतच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भरत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली. आज पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीस होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्यानी बंदुकीतून स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. ते सकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांची पत्नी अकराच्या सुमारास चौकीत आली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी रेस्ट रुम उघडून बघितली असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कर्मचाऱ्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. भरत दत्ता आस्मर मागील काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते. गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले होते. या घटनेनंतर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अस्मार यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नाेंद करण्यात आली आहे.