(रत्नागिरी)
रत्नागिरीतील मच्छीमारांना मुंबईच्या सागरी जलदीमध्ये जाऊन मासेमारी करणे महागात पडले आहे. मुंबईतील मच्छीमारांनी घेराव घालत रत्नागिरीतील ६ मच्छीमारी नौकांची कोट्यवधीची लूटमार केली. लाखो रुपयाची मासळी लुटून फिश फायंडर, जीपीएस यंत्रणा काढून घेतली. जाळी फाडून काहींना धक्काबुक्की केल्याचे समजते. या प्रकरणी मुंबईच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागाला सूचना देऊन त्या ६ नौका रत्नागिरीत स्थानबद्ध करून ताब्यात ठेवण्यात आल्या आहेत.
या घटनेबाबत येथील मत्स्य विभागाने दुजोरा दिला. मिरकरवाडा, राजिवड्यातील त्या ६ नौका मुंबई मत्स्य विभागाच्या आदेशनुसार किनाऱ्यावर स्थानबद्ध केल्या असल्याचे सांगण्यात आले. मासेमारी करणाऱ्या नौकांचा बंदर परवाना असतो. ज्या बंदराचा परवाना असतो त्याच ठिकाणच्या समुद्रात नौकांनी मासेमारी करणे बंधनकारक असते; परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात मासे मिळत नसल्याने रत्नागिरीतील ६ मच्छीमार नौका मुंबई उपनगराच्या समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. यामध्ये मिरकरवाड्यातील शफिक दर्वे यांच्याही नौकांचा समावेश होता.
दर्वे यांच्या नौकांना सुमारे १ कोटी रुपये किमतीची मासळी मिळाली होती. याची खबर मुंबईतील काही मच्छीमारांना लागली. त्यांनी रत्नागिरीच्या नौकांना गाठून घेराव घातला. तांडेल आणि खलाशांना धमकावून डांबून ठेवण्यात आले. त्यांनी मासळीसह लाखो रुपये किमतीची फिश फायडिंग यंत्रणा घेतली, तसेच जीपीएस यंत्रणाही घेतली.