जय जय रघुवीर समर्थ. गार ही क्षणिक असते म्हणून परीक्षेत उतरू शकत नाही. चतुराने परीक्षा केली पाहिजे. जिथे परीक्षा घेतली जात नाही तेथे घाव द्यावे घ्यावे लागतात, मूर्खपणाचा अनुभव येतो. घेण्यास योग्य आहे तेच घ्यावे, योग्य नाही ते सोडावे. उच्च नीच ओळखावे त्याला ज्ञान असे म्हणतात. संसाररूपी बाजारपेठेत आले, एका लाभांमुळे अमर झाले आणि एका लाभांमुळे फसवले गेले. त्याच्यामध्ये आपल्या मुद्दल होते ते खर्च झाले. जाणत्याने असे करू नये. सार तेच शोधून घ्यावे. असार सर्व जाणून त्याचा वमनाप्रमाणे त्याचा त्याग करावा. वमन प्राशन करणे हे श्वानाचे लक्षण आहे, तिथे पवित्र ब्राह्मणाचे काही काम नाही. जसे जसे साठवले, तसेच त्याच्या बाबतीत घडले. जे अभ्यास करत आहेत, ते तो सोडत नाहीत. एक दिव्यान्न भक्षण करतात तर एक विष्ठा सावडतात. वर आपल्या वडिलांचा अभिमान दाखवतात. असो विवेक असल्याशिवाय बोलणे म्हणजे व्यर्थ शीण आहे. सर्वांनी श्रवण-मनन अवश्य करावे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारविवेक निरूपण नाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
दशक अकरा समास 5 राजकारण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. कर्म निश्चितपणे करावे. ध्यान निश्चितपणे धरावे. एकदा सांगितलेले निरूपण पुन्हा सांगावे. तसं आम्हाला बोललेलं पुन्हा बोलायला लागतं कारण जे बिघडलेले आहे ते घडले म्हणजे समाधान मिळते. समुदायाने अनन्यभक्ती करावी. इतर लोकांना देखील भक्ती करण्याची प्रेरणा व्हावी, असा या उपायाचा अर्थ आहे. जीवनामध्ये हरिकथा निरूपण हे मुख्य आहे. दुसरे म्हणजे राजकारण आणि तिसरे म्हणजे सर्व विषयी सावधपणे हे महत्त्वाचे आहे. चौथा गुण म्हणजे साक्षेप. म्हणजे नाना शंकाकुशंका दूर करणे. छोटे-मोठे अन्याय असतील तर ते क्षमा करीत जावे. दुसऱ्याच्या अंतर्मनातील भाव ओळखावा. स्वतः निरंतर उदासीन राहावे. नीती-न्यायामध्ये कधीही अंतर पडू देऊ नये. लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावे, त्यांना आपण बोध करावा. प्रापंचिक मदत देखील यथांशक्ती करावी. प्रपंचातील बरा-वाईट काळ ओळखावा. धीर भरपूर असावा. मात्र अतिसंबंध पडू देऊ नये. प्रपंचाचा, उपाधिचा विस्तार करावा मात्र त्याच्यात अडकू नये. वेळप्रसंगी स्वतःकडे कमीपणा, मूर्खपणा घ्यावा. लोकांचे दोष पाहून ते झाकून ठेवावे. दुसऱ्याचे अवगुण नेहमी नेहमी बोलू नये. दुर्जनांना गुन्ह्यात पकडून त्यांच्यावर परोपकार करून सोडावे. नाना उपाय करून अशक्य कार्य साध्य करावे. सभा, समुदाय याच्यातील प्रसंग सावरावा. एखाद्याशी अतिवाद करू नये. दुसऱ्याच्या मनातील इच्छित जाणावे. अनेकांचे त्रास सहन करावे. जर सोसले नाही तर कठीण होईल. दुसऱ्याचे दुःख जाणावे. ऐकून ते वाटून घ्यावे. लोकांचे बरे वाईट सहन करावे. अपार पाठांतर असावे. सोबत विचार देखील केला पाहिजे. परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर राहावे. शांती करवावी. भांडण मिटवावी. अनेकंद्वारे चांगुलपणाचं वळण लावावं. अपाय करायचा असला तरी बोलून दाखवू नये. परस्पर प्रत्यय प्रचितीस आणावा. जो लोकांचे वर्तन सहन करीत नाही, त्याला लोकप्रीयता मिळत नाही मात्र खूप जास्त सहन करत राहिला तरी त्याचं महत्त्व उरत नाही. राजकारण भरपूर करावे परंतु कोणाला कळू देऊ नये. दुसऱ्याला त्रास व्हावा असे आपले अंत:करण नसावे. लोक पारखून सोडावे. मुत्सुद्देगीरीने मानापमान नष्ट करावे आणि मग लोकांशी जवळीक साधावी. त्रासदायक लोकांना दूर ठेवावे, घाबरट लोकांशी बोलू नये. त्यांच्याशी संबंध पडला तर दुसरीकडे जावे. असे हे राजकारण आहे, ते सांगितलं तर ते असाधारण वाटते. अंतकरण शुद्ध ठेवून राजकारण करावे. भीतीग्रस्त लोकांना वर उचलावे, धैर्यवान, युद्ध करणाऱ्या लोकांना कार्यप्रवृत्त करावे. मात्र कधीकधी भीतीग्रस्त माणसाला देखील सहानुभूती दाखवून कार्य प्रवृत्त करावे लागते तर शूराला जास्त चव येतो म्हणून दूर ठेवावे लागते. कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवाय राहू नये, वैभव आले तरी त्याची अभिलाषा धरू नये. एकाच्या पाठीशी राहावे, एकाला पाहायचेच नाही ही काही चतुर्याची लक्षणे नाहीत. त्याग केल्याशिवाय न्याय सांगितला तरी ते मानत नाहीत हित मनामध्ये येत नाही. श्रोत्यांनी विचारले म्हणून उत्तर दिले. यातील कमी जास्त असल्यास श्रोत्यांनी क्षमा करावी. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पंचम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127