(रत्नागिरी)
गेल्या अनेक वर्षांपासून पालखीच्या मानपानावरून सुरू असलेल्या वादामुळे जिल्ह्यातील काही गावांमधील शिमगोत्सव कायद्याच्या बंधनात अडकला आहे. शिमगोत्सवातील वर्षानुवर्षे सुरू असलेले हे वाद मिटविण्यासाठी पोलिसांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधला. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश येऊन जिल्ह्यातील ३४पैकी २८ गावांमधील पूर्वापार वाद मिटले असून, या गावांमध्ये यावर्षी शिमगोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला.
कोकणात साजऱ्या होणाऱ्या शिमगोत्सवात गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. या उत्सवात गावातील ग्रामदैवतेची पालखी घरोघरी फिरणार असल्याने मुंबई, पुणे येथे स्थायिक असलेले गावकरी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल होतात. गावागावांमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच अनेक गावांमध्ये मानपानावरून वाद निर्माण झाले आहेत. गावातील हा वाद थेट न्यायालयाच्या दरबारात गेल्याने गावातील शिमगोत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये गेली अनेक वर्षे शिमग्याचे ढोल वाजलेले नाहीत.
शिमगोत्सव साजरा करण्यावरून तसेच पालखीच्या मानपानावरून विविध गटांमध्ये सुरू असलेले वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा व प्रभारी पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये वारंवार बैठका घेण्यात आल्या. ग्रामस्थांशी संवाद साधत हे वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ३४पैकी २८ गावातील पूर्वापार सुरू असलेले वाद सामोपचाराने मिटविण्यात यश आले आहे. गावांतील वाद मिटल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला शिमगोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, उर्वरित ६ गावांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा निघालेला नाही. या ६ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत,