(रत्नागिरी)
मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर मी लढायला तयार आहे, असे सांगत राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर या मतदार संघात कुणीही लुडबुड करू नये, ही जागा आम्हीच लढू, असे राणेंनी बजावले होते.
नारायण राणे यांना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला कामाला लागण्याचे आदेशही दिल्याचे समजते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील अनेक भाजप कार्यकर्त्यांनीही नारायण राणे यांचं व्हाट्सअप स्टेटस ठेवून आमची उमेदवारी फायनल असल्याचे संकेत दिले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली होती. मात्र अचानक मंगळवारी रात्री आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माघार घेत आहोत, अशी त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. किरण सामंत यांच्या या पोस्टमुळे शिंदेंच्या शिवसेनेने ही जागा भाजपला सोडली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता येथून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवतील, हे असेही स्पष्ट झाले आहे.