(रत्नागिरी)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून खासदारकीसाठी विनायक राऊत यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ‘वंचित’ नेही आता दुसऱ्या यादीत या मतदारसंघासाठी साखरपा येथील परिवर्तनवादी मारूतीकाका जोयशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून काका जोयशी यांनीही याला दुजोरा दिला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या प्रचारालाही प्रारंभ झाला आहे. महायुतीच्या उमेदवारीची घोषणा अजूनही झाली नसल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘कुणाला मिळेल उमेदवारी’ ही उत्कंठा आता तर शिगेला पोहोचलेली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या नावाबाबत उत्सुकता असतानाच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची नावे दोन यादीत जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत ८ उमेदवारांची नावे जाहीर झाली असून रविवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दुसऱ्या यादीत सुमारे १९ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मारुतीकाका जोयशी यांचे नाव जाहीर केले आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मारुतीकाका जोयशी यांनी त्यावेळचे शिवसेना उमेदवार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्या विरोधात उभे राहून ३०,८८२ मते मिळविली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेले भारतीय काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी ६३,२९९ मते मिळाली होती.