3277(राजापूर)
राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील राहुल राजू पर्येंकर या ८ वर्षीय मुलाच्या सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. सर्पदंश झाल्यावर त्याला त्वरीत नजीकच्या देवगड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टर यांनी तो मयत झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ बेळगाव खानापूर पिंपरी येथील राजू पर्येकर हे गेले चार वर्षापासून कामानिमित्त सागवे हमदारेवाडी येथे पत्नी एक मुलगा व दोन मुली यांच्यासोबत राहत आहेत. शुक्रवारी ते स्वतः काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या घरी पत्नी आणि मुले होती. शुक्रवारी सुट्टी असल्याने सर्व मुले एकत्रित घराच्या पाठीमागे असलेल्या कलम बागेत खेळत होती. दुपारी जेवण आटपून पुन्हा खेळण्यास गेली. यावेळी राहुल यांच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. मात्र त्याने आपल्या पायाला काटा टोचला आहे, असे आईला सांगितले.
या दरम्यान त्याला चक्कर येऊन येऊ लागल्याने तेथीलच कातळी येथील डॉक्टरांकडे नेण्यास आले. त्यांनी अधिक उपचारासाठी देवगड येथे पाठविले. मात्र देवगड मध्ये खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे सांगितले.
राहुल हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने सागवे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत देवगड पोलीस स्थानकात खबर देण्यात आली असून देवगड ग्रामीण रुग्णालयात रीतसर पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर आणि पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करत आहेत.