(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जीवनात अनेक संकटे येतात येणाऱ्या संकटावर मात करत पुढे जाणे म्हणजे जीवन ,अशी वाक्य अनेकदा व्याख्यानातून प्रवचनातून किंवा मंचावरून अनेजण बोलतात. मात्र संकटे आणि दुःख काय असते हे संकटांना सामोरे जाणाऱ्या त्या वेक्तीलाच माहित असते . मात्र ज्या वयात आनंदाने खेळायचे मैत्रिणीसंगे रमायचे मनसोक्त फिरायचे त्याच वयातच डोंगरा एवढं दुःख हृदयात घेऊन १० वी बोर्डाच्या परीक्षेतील इतिहासाच्या पेपरला सामोरे जाणाऱ्या जुळ्या बहिणींची हृदय हेलवणारी घटना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रांगव (कुंभारवाडी) येथील या दोन जुळ्या बहिणी तन्वी व जान्हवी दीपक कुंभार यांची दहावीची बोर्ड परीक्षा सुरु असल्याने घरचे वातावरण पूर्णपणे परीक्षेचे आहे. त्यातच उद्या इतिहासाचा पेपर असल्याने या दोघीही रात्री उशीरापर्यँत अभ्यास करत होत्या.अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरु असतानाच अचानक वडिल दीपक कुंभार यांच्या छातीत दुखू लागल्याची चाहूल लागली. श्वास घ्यायला अडचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे त्यांना इतरांच्या मदतीने रात्रीच तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र नियतीच्या आघातासमोर सर्व प्रयत्न असफल झाले. नीयतीने आपला डाव साधला व त्यांची प्राणज्योत वयाच्या ४२ वर्षीच मालवली अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच उद्याचा इतिहासाचा पेपर होता. नेमकी कोणती परीक्षा द्यायची हा बाल मनाला पडलेल्या प्रश्नांनाने सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले. रात्रभर वडिलांच्या मृतदेहा जवळ बसून त्या रडत होत्या. रात्र संपली दिवस उजाडला मात्र इतिहासाचा पेपर आणि घरी वडिलांचा मृतदेह या द्विधा मनस्थिती मुली वडिलांना सोडण्यास तयार नव्हत्या. कारण या पुढे आपले वडील कधीच आपल्या दिसणार नाहीत की सोबत असणार नाहीत.
या दोघींचा आधार आता कायमचाच निघून जाणार या अस्वस्थ भावनेने त्यांनी टाहो फोडला. मात्र वाडीतील काही जाणकार मंडळींनी त्यांना विश्वासात घेऊन पेपरला जाण्यासाठी त्यांची मनाची तयारी केली. सोबत काकी सह इतर व्यक्तींना सोबत घेऊन त्या भाईशा घोसाळकर हायस्कुल कडवई या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आल्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते रडून आवाज पूर्ण पणे क्षीण झाला होता. अशा मनस्थितीत चार किलोमीटर प्रवास करून इतिहासाचा जड अंतःकरनाने पेपरला दिला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची आहे. वडिलांचे हातावरील पोट असल्याने दिवसभर रोजगार करून घर चालवत. नावालाच जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम या न्यायाने वडील काम करुन आपला संसार चालवत होते मिळवणार हात एक मात्र कुटुंबात सात जण त्यातच चार मुली आई सोबत पत्नीची साथ होती.
मुलींच्या शिक्षणाचा खर्चाबरोबर आपलं कुटुंब सांभाळताना वडिलांना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे मोठ्या मुलींने शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी धरली. मात्र वडिलांच्या जाण्याने व डोंगरा एव्हढं दुःख मागे ठेऊन गेल्याने या कुटुंबा समोर सद्या यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे .त्यांची होणारी परवड थांबण्यासाठी लोकांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला पाहिजे. या मुलींच्या शिक्षणाला हातभार लागल्यास परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही अन्यथा जीवनातील कोणत्या परीक्षेने परिस्थिती बदलेल हा पुढे येणारा काळच ठरवेल.
या दोन्ही मुली गरीब कुटुंबातील असून हुशार व मनमिळावू आहेत. आपल्या शाळेतील सहकारी मुली विषयी व शिक्षकांबद्दल नेहमीच आदर ठेवतात. त्यांना पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केल्यास नक्कीच आपले कुटुंब पुढे घेऊन जातील. त्यांच्यावर आलेल्या प्रसंगात आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी संस्था सोबत आहोत.
– शेषेराव अवघडे
(मुख्याध्यापक, भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई)