( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे जगबुडी नदीच्या पुलावर आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास खत घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याने खतांची पोती रस्त्यावर पसरली होती. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज पहाटे एक खताचा ट्रक उलटून अपघात झाला. हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये खतांची पोती होती. भरधाव वेगात असलेल्या या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पुलावर पलटी झाला. यामुळे ट्रकमधील खतांची पोती रस्त्यावर पसरली होती. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका पूर्णपणे बंद झाली.
रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि खतांची पोती बाजूला करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा वाहतूक ही विस्कळीत झाली होती. यामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने दुसऱ्या पुलावरून वळवण्यात आली. या अपघातामुळे होळीनिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.