(राजापूर)
मुंबईत गेली दोन वर्षे आजारी असतानाही गावाची ओढ आणि पालखीचे दर्शन घेण्याची दुर्दम्य इच्छा बाळगलेल्या राजापुरातील एका तरुणाचा पालखीचे दर्शन घेतल्यानंतर काही क्षणातच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
🟧 गावच्या शिमग्याची ओढ, त्यामुळे तो शिमगोत्सवासाठी हट्ट करून गावी आला.. गावी घरात आलेल्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखी घरातून गेल्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्याने जगाचा निरोप घेतला. राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील निलेश शिवराम चौकेकर या अवघ्या 20 वर्षीय तरूणाच्या बाबतीत घडलेली ही दुर्दैवी घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.
🟧 तालुक्यातील सोल्ये माळवाडी शिवराम चौकेकर यांचे दोन वर्षापुर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. वडीलांच्या निधनाचा पचंड मानसिक धक्का निलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या मात्र आजार कोणता याचे निदान झालेले नाही. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शिमगोत्सव साजरा करण्यात आलेला नाही. यावर्षी पुर्वीप्रमाणेच शिमगोत्सव साजरा होणार असल्याने निलेशने आपल्या आई व भावाकडे हट्ट सुरू केला मला शिमगोत्सवाला गावी जायचे आहे. देवीचे दर्शन घेणार म्हणून सांगू लागला.
🟧 सुरूवातीला त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हट्टापुढे हार मानत त्यांच्यासहीत सोल्ये माळवाडी येथील घर गाठले. सोल्येचा शिमगोत्सव सुरू झाल्यावर मानाची घरे घेत पालखी माळवाडी येथे गेली. दरम्यान निलेशची तब्बेत बिघडली होती. तरी त्यांने हार न मानता घरात आलेल्या पालखीचे व देवीचे दर्शन घेतले. घरातील मंडळींनी हौसीने देवीची पुजा करीत ओटी भरली. गावकऱयांशी हसत खेळत असताना पालखी शेजारी असलेल्या घरी गेली. याचवेळी निलेश याचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. निलेशच्या मृत्यूची बातमी खेळगडी व गावात पसरताच पुर्ण गाव सुन्न झाला. दहा मिनिटापुर्वी देवीचे दर्शन घेणाऱ्या निलेशचा मृत्यू झाल्याने सर्वानाच चटका लावून गेला. निलेशला शेवटचे देवीचे दर्शन घ्यायचे होते म्हणूनच त्याने हट्ट धरून गाव गाठले. त्यांची इच्छा पुर्ण होताच त्याने आपला देह ठेवला. एक होतकरू तरूण अचानक गेल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परीवार आहे.