(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील पत्रकार आणि दै. तरूण भारत रत्नागिरी आवृत्तीचे जाकादेवी वार्ताहर व रत्नागिरी 24 न्यूजचे जाकादेवी प्रतिनिधी तसेच जाकादेवी येथील तात्यासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संतोष रामचंद्र पवार आणि त्यांचे बंधू पत्रकार किशोर रामचंद्र पवार यांच्या मातोश्री सुमन रामचंद्र पवार यांचे बुधवार दिनांक 27 मार्च रोजी अल्पशा आजाराने रत्नागिरी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. सुमन पवार या अतिशय प्रेमळ, हसतमुख व मनमिळाव स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात माणसे जोडण्याचे काम केले. तसेच आपल्या पतीच्या साह्याने त्यांनी संसाराचा गाडा उभा करताना आपल्या चारही मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन सन्मार्गाला लावले. तसेच त्यांच्यावर आदर्शवत संस्काराचे बीज पेरून त्यांना धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचे धडे दिले.
कळझोंडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११च्या त्या सदस्या होत्या. तसेच कळझोंडी येथील महिला मंडळाच्या अतिशय सक्रिय कार्यकर्त्यां म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम केले होते. त्यांचे पती रामचंद्र पवार हे देखील एकेकाळ कळझोंडी गाव शाखेचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर त्यांनी काम करताना आपल्या सत्कार्याने समाजात मानाचे स्थान कमावले. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध स्तरातील मंडळी , त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि मोठ्या संख्येने लहानथोर बंधुभगिनी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांचा जलदान विधी कार्यक्रम मंगळवार दि. 2 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. यावेळी जलदान विधी तथा पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रमाला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन कळझोंडी गावशाखेच्या वतीने करण्यात आले आहे.