(लांजा)
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन उदमांजरांचा (रानमांजर) मृत्यू झाल्याची घटना रविवार, २४ रोजी लांजा धुंदरे दाभोळे रस्त्यावर घडली. वनविभागाने या प्रकरणी अपघात करणाऱ्या वाहनाचा तपास सुरू आहे.
रविवारी लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्यासदृश दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घटली. प्राणी मित्र उदय पाटोळे, सिराज नेवरेकर यांनी वनविभाग अधिकारी दिलीप आरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन हा कोणता प्राणी असावा, यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे माहिती अहवाल मागवला होता.
आरेकर यांनी सकृतदर्शनी रानमांजराची पिल्ले असण्याची शक्यता वर्तवली होती. पशुसंवर्धन अधिकारी प्राजक्ता बर्वे, वनरक्षक वाघाटे यांनी या प्राण्यांचे शव ताब्यात घेतले. विच्छेदनानंतर ते दुर्मीळ असे उदमांजर असल्याचे स्पष्ट झाले. त्या प्राण्यांना दफन करण्यात आले आहे. उदमांजराचा रंग साधारण काळसर मातकट असतो. काही काही ठिकाणी पूर्ण काळी उदमांजरेही पाहण्यात आली आहेत. मातकट रंगाच्या यांच्या पाठीवर काळे पट्टे असतात.
या प्राण्याला लांब शेपटी असते. टोकाकडे काळसर असलेली मातकट शेपटी झुपकेदार असते. यांचे पंजे काळ्या रंगाचे असतात, तर पायावर भुरकट ठिपके असतात. उदमांजर साधारण दोन ते अडीच फुटापर्यंत वाढते. याचं वजन सुमारे साडेचार किलोच असते. ही उदमांजर स्वतःच्या हद्दी आखून घेतात. वनविभाग अधिकारी दिलीप आरेकर यांनी वन्यजीव कायद्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. वनखाते तसेच पोलिस अधिक तपास करत आहेत.