(लांजा)
दारूचा व्यवसाय तक्रारी करून बंद पाडल्याच्या रागातून होळीच्या मांडावर ३२ वर्षीय तरुणाला ११ जणांनी मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी साटवली येथे घडली असून, ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साटवली लावगणवाडी येथील जितेंद्र सुरेश चव्हाण (वय ३२) याने दोन वर्षांपूर्वी प्रकाश रघुनाथ माने गावात दारूचा चोरटा व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी करून हा व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले होते. रविवारी होळीच्या मांडावर प्रकाश आणि जितेंद्रची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा प्रकार पाहून प्रकाशच्या घरातील राहुल प्रकाश माने, राजेंद्र रघुनाथ माने, शुभम माने तसेच त्यांचे मित्र योगेश चाळके, रवींद्र गुणाजी तरळ, सदानंद गुणाजी तरळ, तसेच चैतन्य, धोंड्या, राजू, रवींद्र (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांनी जितेंद्रला मारहाण करत शिवीगाळ गेली. जितेंद्रचे वडील व भिकाजी तरळ यांनी धाव घेऊन त्यांना सोडवले व जितेंद्रला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अधिक उपचारासाठी जितेंद्रला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1