(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या नवरा माझा नवसाचा पार्ट 2 या चित्रपटाच्या गणपतीपुळे येथे झालेल्या शूटिंगमुळे पुन्हा एकदा गणपतीपुळेच्या पर्यटनाला नवीन चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच “नवरा माझा नवसाचा” पार्ट – 2 चित्रपटाच्या शूटिंगमुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला पुन्हा मोठी पसंती दर्शवल्याचे चित्र दिसून येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गणपतीपुळेच्या पर्यटनात आणखी भर पडेल असा अंदाज स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आला आहे.
या ठिकाणी चार दिवसांच्या कालावधीत झालेल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे गणपतीपुळे येथे पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांबरोबरच आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ठिकठिकाणी नव्या चित्रपटाच्या शूटिंगची प्रसिद्धी पर्यटकांमधून करण्यात येणार असल्याने गणपतीपुळेच्या पर्यटनस्थळाचे नाव आणखी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. एकूणच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागतील असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. एकूणच गेल्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटामुळेच गणपतीपुळेच्या पर्यटनात मोठी भर पडल्याचे आजही स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जाते. या संपूर्ण पर्यटनाचा बहर सचिन पिळगावकर यांच्या पहिल्या चित्रपटामुळे आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे याचे श्रेय सचिन पिळगावकर यांना दिले जात आहे.
एकूणच दहा वर्षांपूर्वीच्या चित्रपटापूर्वीची आणि त्यानंतर आता पुन्हा गणपतीपुळे येथे होणारी पर्यटकांची वाढ याला सचिन पिळगांवकर यांचा चित्रपटच कारण ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. गणपतीपुळ्याच्या पर्यटन क्षेत्राला नवीन चालना दिल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ सचिन पिळगांवकर यांचे विशेष ऋण व्यक्त करून आनंदी आहेत. आता त्यांच्या नवरा माझा नवसाचा पार्ट 2 या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.