(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे-मालगुंड येथील मंगलमूर्ती मित्रमंडळ आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हरआर्म मैत्री चषक लीग क्रिकेट स्पर्धेत भगवतीनगर भुतेवाडी येथील जय भैरी संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. तर मालगुंड येथील गणेश दर्शन सप्लायर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच भंडारपुळे येथील ओमकार नादेंश्चर संघाला तृतीय क्रमांक संपादन केला.
सदर स्पर्धा मालगुंड येथील डॉ. नानासाहेब मयेकर खारभूमी मैदानावर तीन दिवसीय कालावधीत पार पडली. या स्पर्धेत मालगुंड- गणपतीपुळे येथील विविध संघ मालकांचे मात्तबर संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्याचा सामनावीर जय भैरी संघाचा सुरज भुते ठरला. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अजय साळुंखे, उत्कृष्ट फलंदाज सुरज चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज राजन झोरे व मालिकावीर सुरज भुते आदींना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तसेच अंतिम विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांक प्राप्त संघाला रोख रक्कमेचे पारितोषिक व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती साधना साळवी, रत्नागिरी तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष राजू साळवी, उद्योजक संदीप कदम, गणपतीपुळे मोरया वॉटर स्पोर्टचे अध्यक्ष उदय पाटील, गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, व्यावसायिक भूषण मयेकर, अमित साळवी, महेश चव्हाण, सागर राजवाडकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.