(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील श्री चंडिका मित्र मंडळ यांचेवतीने मालगुंड गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीच्या शिमगोत्सवानिमित्त येथील राणे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या मालगुंड पंचक्रोशी मर्यादित भव्य दिव्य कबड्डी लीग स्पर्धेमध्ये नेवरे येथील संघमालक ऋषभ मोरे यांच्या एम आर स्पोर्ट संघाने या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. तर मालगुंड येथील संघमालक राजेंद्र दुर्गवळी यांच्या चैतन्य स्पोर्ट संघाने या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानले.
दिनांक 18 ते 19 मार्च या तीन दिवसीय कालावधीत या स्पर्धेचे अत्यंत सुंदर व नेटके आयोजन राणे क्रीडांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मालगुंड पंचक्रोशीतील संघमालकांचे एकूण आठ मात्तबर संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल सामना एम आर स्पोर्ट नेवरे विरुद्ध अनादी फाउंडेशन जाकादेवी या दोन संघांमध्ये खेळला गेला. त्यानंतर दुसरा सेमी फायनल सामना तन्वी डेकोरेटर्स मालगुंड विरुद्ध चैतन्य स्पोर्ट मालगुंड या दोन संघांमध्ये खेळला गेला.
पहिल्या सेमीफायनलमध्ये संघमालक ऋषभ मोरे यांच्या एम आर स्पोर्ट नेवरे संघाने संघमालक प्रतिक देसाई यांच्या अनादी फाउंडेशन जाकादेवी संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये संघमालक राजेंद्र दुर्गवळी यांच्या चैतन्य स्पोर्ट मालगुंड संघाने संघमालक सचिन दुर्गवळी यांच्या तन्वी डेकोरेटर्स मालगुंड संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना एम आर स्पोर्ट नेवरे विरुद्ध चैतन्य स्पोर्ट मालगुंड या दोन संघांमध्ये खेळला गेला. त्यामध्ये अटीतटीच्या रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात एम आर स्पोर्ट नेवरे संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर चैतन्य स्पोर्ट मालगुंड संघाचा पराभव करीत या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले.
यावेळी या संघातील अष्टपैलू खेळाडू ठरलेला शुभम साळवी उपस्थित कबड्डी प्रेक्षकांच्या खास सर्वाधिक पसंतीचा खेळाडू ठरला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात शुभम साळवीवर प्रेक्षकांमधून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये शुभम साळवीने केलेल्या चमकदार कामगिरीची वाहवा संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीतून करण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम दिवशी प्रो कबड्डी स्टार खेळाडू आदित्य शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने सर्वच कबड्डी खेळाडूंचा खेळ उंचावला. तसेच सर्वच कबड्डी संघांसाठी आदित्य शिंदे खास प्रेरणादायी खेळाडू ठरला.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू शुभम साळवी एम आर स्पोर्ट नेवरे,उत्कृष्ट पकड भूवन मयेकर एमआर स्पोर्ट नेवरे, उत्कृष्ट चढाई शुभम किंजळे चैतन्य स्पोर्ट मालगुंड तर अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून एम आर स्पोर्ट नेवरे संघाच्या ओंकार पाटील आदींना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये अनादी फाउंडेशनचा खेळाडू मंदार कळंबटे याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर संघमालक प्रतिक देसाई यांच्या अनादी फाउंडेशन जाकादेवी संघाने तिसरा क्रमांक प्राप्त केला तर संघमालक सचिन दुर्गवळी यांच्या तन्वी डेकोरेटर्स मालगुंड संघाचा उत्कृष्ट डिफेंडर अभिषेक उर्फ भैय्या साळवीच्या दमदार कामगिरीमुळे तन्वी डेकोरेटर्स मालगुंड संघाने चौथ्या क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील अंतिम विजेत्या एम आर स्पोर्ट नेवरे संघाला रोख रुपये 15000 व भव्य दिव्य मानाचा चषक बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या प्रो कबड्डी स्टार खेळाडू आदित्य शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर उपविजेत्या चैतन्य स्पोर्ट मालगुंड संघाला रोख रुपये दहा हजार व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तृतीय क्रमांक प्राप्त अनादी फाऊंडेशन जाकादेवी व चतुर्थ क्रमांक प्राप्त तन्वी डेकोरेटर्स मालगुंड संघाला आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रो कबड्डी स्टार खेळाडू आदित्य शिंदे यांचे समवेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सह कार्यवाह तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाह बाळकाका देसाई, , मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले, सेवानिवृत्त माजी कृषी अधिकारी विलास राणे, मालगुंड मराठा समाजाचे अध्यक्ष सुजित साळवी, उद्योजक उदय साळवी, विकास साळवी, बंडू साळवी, प्रतिक देसाई, रोहित मयेकर, भूषण मयेकर, शैलेश उर्फ बाबा मयेकर, रोहित साळवी, बंटी साळवी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये विशेष योगदान व सहकार्य देणाऱ्या सर्व प्रमुख मंडळींचा सन्मान श्री चंडिका मित्रमंडळ मालगुंड यांचे वतीने ककरण्यात आला. तसेच स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पंच मंडळी, समालोचक, निवेदक आणि या स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या जागामालक राणे परिवार यांचा व विशेष योगदान देणाऱ्या बाबा मयेकर यांचा खास सन्मान या स्पर्धेमध्ये करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री चंडिका मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.