जय जय रघुवीर समर्थ. शून्यत्वाच्या उपाधीशिवाय असलेले आकाश म्हणजेच निराभास ब्रह्म होय. त्या निराभासातून मूळमायेचा जन्म झाला. चंचलता हे मूळ मायेचे लक्षण आहे पंचभुते आणि त्रिगुण हे चंचलतेच्या म्हणजे वायूच्या अंगामध्ये असतात. आकाशापासून वायू झाला त्याला वायुदेव म्हणतात. वायूपासून अग्नी झाला तो अग्नीदेव. अग्नीपासून पाणी झाले ते नारायणाचे स्वरूप. पाण्यापासून पृथ्वी झाली ती बिजाकार आहे. त्या पृथ्वीच्या पोटी पाषाण निर्माण झाले. पाषाण म्हणजे अनेक देवांचे लक्षण असून पाषाण देवी असं पृथ्वीला म्हणतात.
नाना झाडे, माती या विश्वलोकांमध्ये दिसते. तिथे अनेक देवतांना आश्रय मिळालेला आहे. या सगळ्यांमध्ये देखील वायू असतो. देवयक्षणी कात्यायनी, चामुंडा, जखिणी, मानवीनी, नाना शक्ती नानास्थानी देशपरत्वे असतात. पुरुषाचे नावाचेही अनेक देव आहेत. भुते, देवते, नपुसकलिंगी अनेक नावे सांगता येतील. देव-देवता भुते ही पृथ्वीवर असंख्य आहेत पण या सगळ्यांना वायूस्वरूप आहे. वायूचे स्वरूप सदा असते, प्रसंगी नाना देह धारण करणे, गुप्त होणे प्रगट होणे हे त्याच्यामध्ये आढळते. वायू स्वरूपामध्ये ते विहार करतात, वायु स्वरूपामध्ये जगामध्ये असतात आणि जाणीव, वासना ही या चैतन्याची वृत्ती वायुमुळे दिसून येते.
आकाशापासून वायू झाला, तो दोन प्रकारांमध्ये विभागला. त्याचा सावधपणे विचार केला पाहिजे. एकाला वारा असं म्हणतात हे सगळे जाणतात तर दुसऱ्याला जगतज्योती म्हणतात. जगतज्योती म्हणजे चैतन्याची नावे आहेत. या चैतन्याच्या म्हणजे देव देवतांच्या अनंत मूर्ती आहेत. वायू अशाप्रकारे विकारला परंतु दोन प्रकारामध्ये विभागला गेलेला आहे. आता तेजाचा विचार करायला पाहिजे. वायूपासून तेज झाले. उष्ण आणि शीतळ असा दोन प्रकारचे रूप असलेला प्रकाश आहे. उष्ण रूपापासून सूर्य, देदीप्यमान प्रकाश आणि सर्वभक्षक अग्नी निर्माण झाला. त्याच्यातूनच विद्युल्लता देखील निर्माण झाली. शितलपासून अमृत निर्माण झालं, चंद्र, तारे आणि थंडपणा निर्माण झाला. आता श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. तेज पुष्कळ प्रकाराने प्रगट झाले परंतु तेही दोन प्रकारचे आहे. पाणीही दोन प्रकारचे आहे. पाणी आणि अमृत. आता पृथ्वीचा विचार घ्या. पाषाण, मृत्तीका म्हणजे पृथ्वी, आणि दुसरा प्रकार म्हणजे सुवर्ण, परीस, नाना रत्ने, बहुरत्ना वसुंधरा. कोणती खोटी कोणती खरी? सगळे विचार केल्यावर समजते आणि रूढ होते. मनुष्य कुठून आले? हा प्रश्न राहिला, त्याच्या उत्तरासाठी श्रोत्यांनी सावधानता बाळगली पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक दहा समास चौथा बीज लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आता असे पहा, माणसापासून माणसाची उत्पत्ती होते. पशुपासून पशु उत्पन्न होतात. पक्षी, जमिनीवरती विहार करणारे, रानात, जंगलात राहणारे आणि पाण्यात राहणारे अशाप्रकारे शरीरापासून शरीरे निर्माण होतात हे हे प्रत्यक्ष दिसत आहे, त्याच्यासाठी तर्क करायची गरज नाही. रस्ता चांगला असेल तर आडरानात जाऊ नये त्याप्रमाणे हे लक्षात घ्यावे. संकरित प्रजेपासून विपरीत होतात पण त्यालाही शरीरच म्हणतात. शरीर असल्याशिवाय उत्पत्ती होणार नाही. म्हणजे उत्पत्ति कशी झाली? कोणी केली? त्याचे शरीर कोणी निर्माण केलं? हे पाहिलं तर अनेक प्रश्न निर्माण होतात.
मात्र मुळात शरीर आलंच कसं? कशापासून उभारलं? कसं काय झालं? ही एक मागे शंका व्यक्त करण्यात आली, ती राहून गेली होती. तिचे उत्तर ऐका. उगीचच दुराग्रह धरू नका प्रत्यय घ्या. प्रत्यय किंवा अनुभव हाच प्रमाण आहे आणि मूर्खाला तो प्रमाण वाटत नाही. अनुभवामुळे विश्वास निर्माण होतो. ब्रम्हापासून मूळ माया झाली तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हटले जाते. मूळ मायेमधून त्रिगुणांमुळे त्रिगुण निर्माण झाले त्याच्यातून भुते निर्माण झाली. ही मूळमाया वायुस्वरूप असून वायूमध्ये जाणिवेचे रूप आहे. तिच्या इच्छेचा ब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही. असं समर्थ सांगत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1