जय जय रघुवीर समर्थ. देवळामध्ये जगन्नाथ आहे आणि देवळावर कावळा बसलेला आहे पण तो देवाहून अधिक म्हणू नये. राजद्वारी सभा बसलेली आहे आणि माकड खांबावर उंच स्थानी गेले पण ते सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आणि चतुर आहे असं कसं मानायचं? ब्राह्मण स्नान करून गेले आणि बगळे तिथेच बसले पण म्हणून ते ब्राह्मणापेक्षा भले कसे मानायचे? ब्राह्मणामध्ये कोणी व्यवस्थित तर कोणी अस्ताव्यस्थ आणि श्वान सदा ध्यानस्थ. पण ते उत्तम नव्हे. ब्राह्मण लक्षमुद्रा ओळखत नाही आणि मांजर त्या विषयी शहाणे, म्हणून त्याला ब्राह्मनापेक्षा विशेष म्हणावे का? ब्राह्मण भेदाभेद पाहतो आणि मक्षिका सगळ्यांना अभेद मानते पण तिला ज्ञानबोध झाला हे घडत नाही. नीच व्यक्तीने उच्च वस्त्रे घातली आणि समर्थ उघडा बसला परंतु परीक्षावंतांनी परीक्षा केली. बाह्य आकार मोठा केला तरी ती वरवरची स्थिती, अंतरनिष्ठा पाहिजे. लौकिक चांगला संपादन केल पण आतून सावध झालेला नाही. मुख्य आत्मारामाला चुकला तो आत्मघातकी.
देवाला भजले असता देवलोक, पितरांचे भजन केले असता पितृलोक मिळतो. भूतांचे भजन केला असता भूतलोक मिळतो. ज्याने ज्याचे भजन करावे त्या लोकाला तो जातो. निर्गुणी भजन म्हटले असता निर्गुण होतो. निर्गुणाचे कसले भजन? स्वतः निर्गुण होणे हेच त्याच अनन्य भजन. ते केले की निश्चितपणे धन्य होतो. सर्व केल्याचं सार्थक म्हणजे देव ओळखावा, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. देव पाहिला तर निराकार आहे, आपण हा मायिक विचार आहे. सोहम आत्मा हा निर्धार बाणून गेला आहे. आता अनुमान कशासाठी? वस्तूच्या ठिकाणी वस्तू आहे. देह भाव काहीच नाही. सिद्ध आणि साधन हे सगळेच अनुमान आहे. मुक्ताला बंधन आढळत नाही. साधनाने जे काही साधावे ते आपणच अपोआप होऊन जातो. आता साधकाच्या नावे शून्याकार आहे.
कुंभाराला राजपदवी मिळाली तर त्याने गाढव कशासाठी राखायची? आणि कुंभारपणाच्या उठाठेवी कशासाठी पाहिजेत? तसा वृत्तीचा जो भाव आहे तिथे नाना साधनांचा उपयोग करण्याची गरज नाही. साध्य झाल्यानंतर साधनांचे कारण नाही. साधनांनी काय साधायचं? नियम करून कोणते फळ मिळवायचे? आपणच वस्तू मग गोंधळ कशासाठी घालायचा? तू स्वतःला देह समजत असलास तर तू पंचभौतिक झालास. जीव समजत असलास तर नुसता अंशमात्र झालास. पण परमात्माच समजत असशील तर अनन्य होण्याचा मार्ग धर. शांतपणे पाहिले असता मीपण दिसते. शोध घेतला तर काहीच नसतं. तत्त्वाने तत्वाचा निरस होतो पुढे निखळ आत्मा असतो.
आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे जीव जीवाच्या ठिकाणी आहे आणि माया मायेच्या रूपाने विस्तारली आहे. असं सगळंच आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सगळं शोधून पाहतो तोच ज्ञानी. सगळ्यांना शोधू पाहतो मी पणाची वृत्ती ठेवत नाही, असा ज्ञानी पोहोचलेला असतो. वृत्तीरुपाने पाहिले तर मग काहीच राहत नाही. प्रकृतीचा निरास झाल्यामुळे सगळे विकार गेले. मग निखळ निर्गुण जे उरलेले आहे तेच आपण आहोत अशी ही परमार्थाची अगाध खूण आहे. फळ एक आणि आपण एक असा हा विचार नाही आत्मस्वरूप हे सर्वश्रेष्ठ फळ स्वतः होऊन जायचं आहे. भिकारी होता तो राजा झाला. त्याकडे पाहू लागल्यावर प्रत्यय आला. मग भिकाऱ्याची गडबड भिकाऱ्याने करावी. वेदशास्त्र, पुराण, नाना साधने, निरूपण हे सिद्ध साधू ज्याच्या साठी सायास करतात ते ब्रह्मरूप प्राप्त झाल्यावर करणे, न करणे यात वावगे काहीच राहत नाही. असं समर्थ सांगत आहेत. अधिक माहिती ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1