(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, थोर शिक्षणप्रेमी,जाकादेवी सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार शिवराम देसाई यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी बुधवार दि. १३ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
नंदकुमार देसाई हे जाकादेवी ओरी परिसरातील नावाजलेले आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. प्रारंभीच्या कालखंडात हॉटेल व्यवसायातही त्यांनी अतिशय चांगले यश प्राप्त केले होते. ते ध्येयवादी आणि खूप मेहनती होते. शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्याची त्यांना कमालीची आवड होती. त्यांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाच्या दृष्टीने चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.
जाकादेवी पंचक्रोशीत नंदूकाका या नावाने ते प्रसिद्ध होते.नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.सर्व धर्मीय व सर्व स्तरातील नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आपुलकीच्या संबंधांमुळे त्यांनी खूप माणसं जोडली आणि जपलीही. कै.नंदुकाका देसाई यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना,गरजवंतांना मोठ्या मनाने, सढळ हस्ते मदत केली.
ते अत्यंत प्रेमळ, सुसभावी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होते. छोट्या मोठ्यांमध्ये ते सहज रमून जात असत.त्यांचे अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी मित्रत्वाचे संबंध होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, पत्नी, सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.यांच्या निधनाबद्दल ओरीसह जाकादेवी पंचक्रोशी व तालुक्यातून दुःख व्यक्त होत आहे.