(गुहागर)
महिला सक्षमीकरण आणि महिला व बालकल्याण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शासन स्तरावरून नवप्रक्रम घेण्याबाबत सुचित केले होते. या अनुषंगाने ग्रामपंचायत उमराठ कार्यक्षेत्रातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि उमराठ कोंडवीवाडी येथील अंगणवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस नुकताच दि. ८.३.२०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथील अंगणवाडीत सदर महिला दिवस साजरा करताना सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पोलीस पाटील श्रीम. वासंती आंबेकर आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मालती आंबेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी सेविका राधा आंबेकर यांनी मदतनीस सौ. निलम जोशी यांच्या मदतीने उपस्थित पोलीस पाटील, उमराठ खुर्द आंबेकरवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि प्रतिनिधी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी छोट्याश्या कार्यक्रमात पोलीस पाटील श्रीम. वासंती आंबेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल उपस्थित महिलांना माहिती देऊन कशाप्रकारे संघर्ष करून महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला या बद्दल मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका राधा आंबेकर यांनी पोषण आहार व कुपोषण संदर्भात माहिती उपस्थित महिलांना दिली. तसेच लेक लाडकी योजना, बालसंगोपन योजना, माझी कन्या भाग्यश्री इत्यादि सारख्या योजनांची व महिला बालकल्याण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची कार्यवाही व जनजागृती करण्याबाबतचे मार्गदर्शन सुद्धा केले. तसेच उमराठ कोंडवीवाडी येथील अंगणवाडीत सुद्धा जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. तेथे अंगणवाडी सेविका सौ. सानिका धनावडे यांनी लेक लाडकी योजनेबाबत मार्गदर्शन केले.
शेवटी जागतिक महिला दिनानिमित्त रोज लिहूया व वाचन करूया हा उपक्रम राबविण्यात आला व या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढून जागतिक महिला दिवसाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता.