(फुणगूस / एजाज पटेल)
मद्यधुंद अवस्थेत चालक एसटी बस चालवत असल्याचे लक्षात येताच त्याला बाजूला करत एसटी वाहकाने बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेत चक्क फुणगूस ते करजुवे आणि पुन्हा परतीच्या मार्गांवर संगमेश्वर पर्यंत सुमारे तीस ते पस्तीस कि. मी. बस चालवल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना गुरुवारची असून, सकाळी 11.40 वाजता सुटणारी एसटी संगमेश्वर ते फुणगूस व्हाया डिंगणी मार्गे करजुवेकडे जाणाऱ्या प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या चालकविरुद्ध देवरुख आगार वरिष्ठठांकडे तक्रार देण्यात आली असून, या सर्व प्रकारमुळे मात्र एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देवरुख आगार भोंगळ आणि मनमानी कारभार तसेच दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या, नादुरुस्त व खुळखुळ्या झालेल्या बसेस यामुळे सर्वश्रुत चर्चेत असून प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यामुळेही नेहमीच प्रकाश झोतात असते. काही दिवसापूर्वीच देवरुख -संगमेश्वर बस भरधाव वेगात चालवल्यामुळे बस दरीत जाऊन झालेल्या अपघातात तेरा प्रवाशी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच काल गुरुवारी देवरुख आगाराचा चालक डी. बी. गवळी संगमेश्वरहुन डिंगणी मार्गे करजुवे ही 11.40 ची बस घेऊन निघाला असता तो बस वेडीवाकडी तसेच मध्येच अतिवेगात बस हाकत होता. त्याचा एकंदरीत सर्व प्रकार व हावभाव पाहता वाहक संजय. बी. अवटे व प्रवाशांच्या हा प्रकार ध्यानी आला. तोपर्यंत संगमेश्वर पासून सुमारे 14 कि. मी. अंतरावर असलेल्या फुणगूस पर्यंत बस पोहचली होती. तेथपर्यंत प्रवाशांना जिवमुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागला.
या बससाठी वाहक असलेल्या संजय. बी. अवटे याच्याही चालक मद्यपान करून आहे, हे लक्षात आल्याने त्याने या सर्व प्रकाराची माहिती देवरुख वरिष्ठठांना दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन म्हणुन वाहक कम चालक असलेल्या वाहकाने फुणगूस येथे चालकाला जोरजबरदस्तीने बाजूला करत प्रवाशी तिकीटाच्या कामासह बसच्या स्टेरिंगचा अतिरिक्त ताबा घेऊन करजुवे गाठून तेथून पुन्हा डिंगणी मार्गे फुणगूस संगमेश्वर असा सुमारे तीस ते पस्तीस कि. मी. बस चालवली.
Also Read : जयस्तंभ परिसरात मारहाण प्रकरणी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल
या बाबत देवरुख डेपो मॅनेजर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार देवरुख येथून वरिष्ठ संगमेश्वर येथे येईपर्यंत चालक गवळी याने संगमेश्वर आगार नियंत्रक शिंदे यांना आपण बाह्यविधीसाठी जात आहे असे सांगून त्याची बॅग ठेऊन गेला, तो परत आलाच नाही. त्यामुळे वाहक अवटे तसेच आगार नियंत्रक शिंदे यांनी दिलेल्या जबाबनुसार चालकावर निलंबन कारवाई करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
सामान्य नागरिकांना एसटी चा प्रवास आपला प्रवास वाटतो. आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी अनेकजण ट्रॅव्हलस व इतर खाजगी प्रवासाकडे दुर्लक्ष करून एसटीनेच प्रवास करतात. वेळ जास्त लागला तरी चालेल पण एसटीने सुखकर प्रवास करावा हाच हेतू असतो. परंतु मद्यपी चालकांमुळे प्रवाशांमध्ये घाबराटीचे वातावरण पसरले असून अशा चालकांविरोधात धडक व कडक कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य प्रवाशी वर्गातून मागणी केली जात आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1