(गावखडी / दिनेश पेटकर)
प्रतिवर्षाप्रमाणे गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिर गावखडी येथे 8 व 9 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त व श्रीदेव रामेश्वराविषयी….
शिव सांब भोळा, नामे अनेक तुजला, रामेश्वरा… जीव खुळा झाला तुझ्या दर्शनाला!
निसर्गाची मुक्त उधळण असलेले, शांततेबरोबरच पावित्र्य जपलेले एखादेच स्थळ असते. हि सर्व वैशिष्ट्ये रत्नागिरी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान श्रीदेव रामेश्वर या देवस्थानांना लागू होतात. रत्नागिरी पासून सुमारे 24 किमी अंतरावर श्रीदेव रामेश्वर हे शंकराचे जागृत देवस्थान आहे.
गावखडी गावचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिकतेचे स्वतंत्र अधिष्ठान लाभलेले हे गाव अनेक थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नाट्यप्रेमी व खेळाडूंमुळे जगाच्या नकाशावर आलेले आहे. येथील पांडवकालीन आख्यायिका असलेले स्वयंभू देवस्थान श्रीदेव रामेश्वर आहे. या मंदिराच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पाच दिवस सतत चालणाऱ्या या उत्सवात हिंदूबरोबरच मुस्लिम बांधवही सहभागी होतात. मंदिराच्या उत्तरेला स्वयंभू सिद्धीविनायकाचे मंदिर व महा विष्णूचे तसेच गरूडाचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर दोन विहिरी, कायम स्वरूपी रंगमंच कार्यालय आहे. श्रावणी सोमवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत येथे जप चालतो. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त स्थानिक संघाचे क्रिकेट, कबड्डी पुरूष व महिला गट लहान मुलांचे कबड्डी सामने तसेच महाशिवरात्री दिवशी सायंकाळी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले आहेत.
Also Read : “महाशिवरात्री” ला शुक्र प्रदोष व्रताचा योगायोग!
गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर
महाशिवरात्रीला सायंकाळी भक्तगणांकडून तीन ते पाच हजार दिप पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच महाशिवरात्री दिवशी अकरा खांबांची एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापूजा बांधण्यासाठी काही भक्तगण भक्तिभावाने तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पहावयास मिळणे दुर्मीळ आहे. ही तांदूळाने बांधलेली महापूजा हे भक्तगणांचे आकर्षणच असते. त्याचप्रमाणे दरदिवशी नाट्य प्रयोगांचेही आयोजन केले जाते. शिवरात्रोतसवाचया पाचव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी विविध स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण केले जाते. सतत पाच दिवस म्हणजे 120 तास हा महोत्सव साजरा केला जातो.
विविध प्रकारच्या स्पर्धांबरोबरच किर्तन, नवग्रह होम, महारूद्, आरती सोहळा असे धार्मिक कार्यक्रमही होतात . श्रीदेव रामेश्वर देवस्थान , शिवरात्र महोत्सव समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी व श्रीदेव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवभक्त सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा महाशिवरात्री महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने मांगल्य, एक प्याने होत आहे. या मंदिराचे पुजारी म्हणून लिंगायत मंडळी हे काम सांभाळतात.
श्रीदेव रामेश्वर मंदिर गावखडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी शिवरात्रोत्सवा निमित्त जत्रेमध्ये उपस्थित असलेल्या जनसमुदायाला आकर्षित करतात ती दुकाने. ही दुकाने विविध प्रकाराने सजलेली असतात. बाहेरील व स्थानिक व्यापारी या जत्रेत आपली दुकाने थाटतात. या जत्रेत हजारो रूपयांचा खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. वर्षांतून एकदा भरणारी ही जत्रा ग्रामीण जनतेच्या जीवनातील आनंद देणारी मोठी पर्वणीच असते.
शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी पहाटे पाच वाजता लघुरूद्, शिवपूजा ,सकाळी आठ वाजताच क्रिडा स्पर्धा, नऊ वाजता शिवदर्शन, व स्थानिक भजने, दहा वाजता महिलांचे हळदीकुंकू दुपारी दोन वाजून तीस मिनिटे पुराणकथा श्री.प्रकाश फडके, साडेतीन वाजता किर्तन ह.भ.प.विद्याधर करंबेळकर राजापूर रात्री आठ वाजताच भोवती आरती मानकरी शिवगण, सुतार, पेटकर, मुडेवाडी. रात्री साडेदहा वाजताच नाट्य प्रयोग मी माझ्या मुलांचा सादरकर्ते सिध्दाई कान्हाई रंगभूमी गावखडी
शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी सकाळी सात वाजता अभिषेक शिवपूजा आठ वाजताच क्रिडा स्पर्धा, दुपारी दोन वाजता पुराण कथन श्री.प्रकाश फडके किर्तन ह.भ.प.विद्याधर करंबेळकर राजापूर, रात्री आठ वाजताच भोवती आरती मानकरी कुंभारवाडी ,रात्री साडेदहा वाजता बक्षीस वितरण सोहळा,रात्री अकरा वाजताच नाट्य प्रयोग बायको माझी भारी देवा लेखक संकेत शेडगे सादरकर्ते श्री.सुदर्शन भाई धर्माजी तोडणकर गावखडी, मुंबई नाट्य प्रयोग संपल्यानंतर पहाटे लळिताचा कार्यक्रम होणार आहे.
गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर नवसाला पावणारी असल्याने लाखो भाविक येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त नतमस्तक होतात. श्रीदेव रामेश्वर या तीर्थक्षेत्राचा महती आणि प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला आली असून श्रीदेव रामेश्वर हे तीर्थक्षेत्र आजही आपले पावित्र्य टिकवून आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1