(रत्नागिरी)
शहरातील ज्या दुकानांवर नामफलक मराठीत म्हणजे देवनागरी लिपीत लावण्यात आलेले नाहीत, अशा दुकानदारांना रत्नागिरी नगर परिषदेने नोटीस देवून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. नोटीस दिल्यापासून ८ दिवसांत नामफलक मराठीत बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १५ दुकानमालकांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सुमारे २ वर्षांपूर्वी दुकानांवरील पाट्या ठळक मराठी भाषेत ठेवाव्यात, असे निर्देश दिले. दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतू ही मुदत संपूनही अनेक दुकानांवरील पाट्या वेगळ्या भाषांमध्ये असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासनाने कार्यवाही सुरु केली. रत्नागिरी शहरातही रत्नागिरी नगरपरिषदेने ध्वनीक्षेपकावरून आणि जाहिराती देवून दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करून घेण्याच्या सूचना केल्या.
Also Read : “मुख्यमंत्री माझी शाळा”मध्ये आगाशे विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम
नगरपरिषदेकडून जाहिर सुचना करूनही अनेक दुकानदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे १५ दुकानदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. मुदत संपुनही दुकानांच्या पाट्या ठळक मराठी भाषेत तयार न करणे हा न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ च्या तुरतुदीनुसार मराठीत पाट्या न करणाऱ्या मालकांवर कायदेशीर दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
Visit us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1