(रत्नागिरी)
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेत खासगी शाळांच्या गटात येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.
या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, शिक्षक बंधू सुधीर शिंदे यांच्यासह सर्व अध्यापक, मामा-मावशी यांनी विशेष प्रयत्न परिश्रम घेतले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध स्पर्धांमधील यशस्विता, शाळा व शाळा परिसर स्वच्छ, नेटका, सुंदर बालोद्यान, संगणक शिक्षणाची सुविधा, सुसज्ज वाचनालय, प्रत्येक उपक्रमाची नियोजनपूर्वक आखणी, उत्तम पालक संपर्क, महावाचन उपक्रमातील शाळेचा सहभाग, स्वच्छता मॉनिटर उपक्रमातील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, बँकिंग, उपयुक्त कार्यानुभव इत्यादी बाबींचा विचार मूल्यमापन समितीने केली. यामध्ये केंद्रात प्रथम निवड, त्यानंतर तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यातही शाळेने प्रथम क्रमांक मिळवत शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली.
याबद्दल अधिकारी वर्ग, पालक, संस्था सदस्य यांच्याकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारत शिक्षण मंडळाच्या सभेतही शाळेच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
मराठी माध्यमाची शाळा असूनही सेमी इंग्लिश, संभा इंग्रजी संभाषणावर अधिक भर दिला जातो. ओंकार ई-लर्निंग संगणक शिक्षण सुरू आहे. स्वतंत्र संगणक कक्ष व प्रशिक्षित शिक्षिका अध्यापन करतात. स्वतंत्र ग्रंथालय, पूर्णवेळ ग्रंथपाल असून वेळापत्रकाप्रमाणे वाचनाच्या तासिका होतात. वर्ष अखेरीला वाचकवीर निवडले जातात. अशी प्रत्येक गोष्टीत जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी ही शाळा आहे.
भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, कॅ. दिलीप भाटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, विजय वाघमारे, संस्था सदस्यांनी कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
Visit us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1