(संगमेश्वर)
तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत विविध गावांसाठी नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत मात्र या योजनेत अनियमितता दिसून येत असून तशा तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन कामातील अनियमितता तक्रार अर्जावर कार्यवाही करत कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात साडेतीन कोटींपेक्षा जास्त निधी नळपाणी योजनांसाठी मंजूर करण्यात आला असून हा निधी खर्च करण्यास पाणी पुरवठा देवरुख उपविभाग अपयशी ठरला असून दोन्ही योजनेंची कामे ठप्प आहेत. राजिवली शिर्केवाडीसाठी विहीर खोदण्यात आली. मात्र त्या विहीरीला पाणी नाही, तरीही अधिका-यांच्या सांगण्यावरून ठेकेदाराने पाईपलाईन टाकून ठेवली आहे. तर कुटगिरी योजनेत दोन गटांत मतभेद घडवून आणत योजना ठप्प करुन ठेवली आहे.
राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील साडेतीन कोटींच्या कामाचे नियोजन करण्यात असमर्थ ठरलेल्या पाणी पुरवठा उप अभियंता यांच्याकडील अतिरिक्त उप अभियंता पदाचा पदभार काढून घेत त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची विभागीय स्तरावर चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी संतोष येडगे यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. कोकण आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
शाखा अभियंत्यांची चौकशी करा
संगमेश्वरातील देवरुख पाणी पुरवठा उप विभाग अभियंता पद रिक्त ठेवण्यात आले आहे. देवरुख उप विभाग अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची करोडो रुपयांची कामे सुरु असून या कामांची जबाबदारी एका शाखा अभियंता यांच्याकडे दिली आहे. शाखा अभियंता सर्व कामात उपयशी ठरत असून त्यांच्याकडील पदभार काढून त्या ठिकाणी नियमित उप अभियंता पदावरील अधिकारी नियुक्त करावा, तसेच सध्याच्या शाखा अभियंता यांच्या कार्यकाळातील सर्व अनियमित कामांची विभागस्तरावरुन चौकशी करण्याची मागणी विभागीय कोकण आयुक्त महेद्र कल्याणकर यांच्याकडे संतोष येडगे यांनी केली आहे.
Also Read : गणपतीपुळे प्राथमिक शाळेला कोकण आयुक्त बलवंत सिंह यांची भेट: शाळेच्या विविध उपक्रमांचे केले विशेष कौतुक !